भुसावळात शिक्षण विभागातर्फे तालुकास्तरीय शाळा पूर्व मेळावा
भुसावळ : शहरातील डी.एस.हायस्कूलमध्ये शिक्षण विभागातर्फे तालुकास्तरीय शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले. प्रशिक्षणासाठी प्रत्येक केंद्रातून दोन याप्रमाणे 16 शिक्षक उपस्थित होते. यात शाळा पूर्व तयारी मेळाव्यामध्ये सात प्रकारचे स्टॉल लावण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले.
डी.एस.हायस्कूलमध्ये मेळावा
शहरातील डी.एस.हायस्कूलमध्ये शुक्रवारी सकाळी 11 वाजता शिक्षण विभागातर्फे तालुकास्तरीय शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रत्येक केंद्रातून दोन अशा 16 जणांची उपस्थिती होती. गटशिक्षणाधिकारी वायकोळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सांगितले की, नाव नोंदणी, शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक आणि भावनात्मक विकास, भाषा विकास, गणन पूर्व तयारी, साहित्य वाटप आणि मार्गदर्शन याप्रमाणे स्टॉलची मांडणी राहणार आहे. या लावावयाच्या स्टॉलचे प्रात्यक्षिक प्रशिक्षणात शिक्षकांना करून दाखवण्यात आले. या मेळाव्याला गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे आणि प्रशासन अधिकारी तुषार प्रधान यांनी मार्गदर्शन केले. शनिवार, 13 एप्रिल रोजी हे प्रशिक्षण केंद्र स्तरावर आयोजित केले जाणार आहे. यात सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. शाळा स्तरावर एप्रिलच्या तिसर्या आठवड्यात पहिला मेळावा होणार आहे. दुसरा मेळावा जून महिन्याच्या तिसर्या आठवड्यात होईल. या प्रशिक्षण वर्गाला सुलभक म्हणून अशोक तायडे, निलेश पाटील यांनी कामकाज पाहिले.


