यावल तहसील कार्यालयातून पळवलेले वाहन रीधूर गावातून जप्त
यावल : यावल तहसील कार्यालयातून अवैधरीत्या गौण खनिज वाहतूक रकणारे वाहन 18 मार्च रोजी पहाटे तिघांनी पळवले होते. याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल होता. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आल्यानंतर शुक्रवारी चोरी केलेले वाहन हे रिधूर गावातून जप्त करण्यात आले तर इतर दोघा पसार संशयीतांचा शोध सुरू आहे.
यावल पोलिसांकडून डंपर जप्त
किनगाव, ता.यावल परिसरात 17 मार्च 2024 रोजी महसूल विभागाने अवैध गौणखनिज वाहतूक विरोधी पथकाने अवैधरीत्या गौण खनिज वाहतूक करतांना अशोक लेलँड कंपनीचे विना क्रमांकाचे वाहन पकडले होते व ते पंचनामा करून यावल येथील तहसील कार्यालयाच्या आवारात लावले होते. 18 मार्च 2024 रोजी पहाटे संशयीत भूषण विठ्ठल कोळी, विठ्ठल भाऊलाल कोळी व स्वप्नील तुषार कोळी यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात मुख्य गेटचे कुलूप तोडून तसेच कार्यालयाच्या आवारात लावण्यात आलेल्या सीसीटिव्ही कॅमेर्यापैकी एक कॅमेरा फोडून विना क्रमांकाचे वाहन लांबवले होते. याप्रकरणी कोतवाल गणेश वराडे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील संशयीत आरोपी विठ्ठल कोळी (रा.रिधूर, ता.जळगाव) यांना अटक करण्यात आली व शुक्रवारी हे वाहन हे रिधुर या गावातून पोलिसांनी जप्त केले. या गुन्ह्यात पसार असलेल्या इतर दोघांचा शोध पोलिस घेत आहेत. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वसीम तडवी करीत आहेत.

