अज्ञात वाहनाच्या धडकेत निमखेडीतील दाम्पत्य ठार

अपघातानंतर वाहन चालक पसार : निमखेडीत पेटल्या नाहीत चुली

0

A couple from Nimkhedi was killed in a collision with an unknown vehicle मुक्ताईनगर : अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी येथील दाम्पत्य ठार झाले. खामखेडा पुलाजवळ हा अपघात मंगळवार, 23 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात सुभाष रामराव घोडकी (41) आणि सोनुबाई सुभाष घोडकी (34, रा.निमखेडी, ता.मुक्ताईनगर) हे दाम्पत्य ठार झाले.

नातेवाईकांना पाहण्यास गेल मात्र मृत्यूने गाठले
मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द येथील घोडकी दाम्पत्य फोपणार, जिल्हा बर्‍हाणपूर मध्यप्रदेश येथे नातेवाईक रुग्णास पाहण्यासाठी गेले होते मात्र परतीच्या प्रवासात पूर्णा नदीजवळील खामखेडा पुलाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकी (क्रमांक एम.एच.19 ई.एफ.9211) ला जोरदार धडक दिली. या अपघातात दाम्पत्य ठार झाले. हा अपघात मंगळवार, 23 एप्रिल रोजी सायंकाळी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास घडला. अपघात प्रकरणी मयताचा पुतण्या प्रवीण घोडकी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात वाहन चालकाविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

निमखेडी गावात शोककळा
सुभाष घोडकी हे अतिशय सुस्वभावी, मनमिळाऊ आणि अल्पभूधारक शेतकरी होते. मोठा मुलगा हा पदवीधर असून तो देखील वैद्यकीय क्षेत्रात काम करून कुटुंबीयाला हातभार लावतो तर लहान मुलगा हा अकरावी वर्गात शिक्षण घेतो. सुभाष घोडकी यांचे वडील काही वर्षांपूर्वीच मयत झाले आहेत. घोडकी यांच्या पश्चात वयोवृद्ध आई आणि दोन मुले आहेत. अपघातात दाम्पत्य ठार झाल्याची माहिती गावात कळताच एकाही घर चूल पेटली नाही. रात्री उशिरा मयत दाम्पत्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.


कॉपी करू नका.