अकुलखेड्यातील तरुणाला भुसावळात लूटले : दोघांविरोधात गुन्हा
भुसावळ : चोपडा तालुक्यातील अकूलखेडा गावातील तरुण भुसावळात कामानिमित्त आल्यानंतर त्यास धमकावत शिविगाळ करीत दोघांनी लूटले. ही घटना रविवार, 28 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास जामनेर रोडवरील अष्टभूजा देवी मंदिराजवळील जैन मेडिकलसमोर घडली. 32 हजार पाचशे रुपयांचा ऐवज लूटल्याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांविरोधात गुन्हा दाखल
दीपक देविदास धनगर (33, सप्तश्रृंगी मंदिरााजवळ, अकुलखेडा, ता.चोपडा) या तरुणाच्या तक्रारीनुसार, रविवारी रात्री आठ ते सव्वाआठ वाजेच्या सुमारास तो मित्र गणेशसह शहरात कामानिमित्त आल्यानंतर जामनेर रोडवरील अष्टभूजा देवी मंदिराजवळील जैन मेडिकलसमोरून जात असताना दोघा संशयीतांना दुचाकी अडवत शिविगाळ व दमदाटी केली. धनगर यांच्या खिशातील 29 हजारांची रोकड व गणेश यांच्या खिशातील दिड हजारांची रोकड व दोन हजारांचा मोबाईल असा एकूण 32 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हिसकावून पळ काढला.


तक्रारदाराने बाजारपेठ पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवल्यावरून दोघा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहेत.