भुसावळ पालिकेच्या सभेत सत्ताधार्यांमध्येच खडाजंगी

ठेकेदारावर कारवाईसाठी सत्ताधार्यांवर नगराध्यक्षांवर दबाव
भुसावळ : अमृत योजनेच्या पाईप लाईनमुळे शहरातील रस्त्यांची अवस्था बकाल झाल्याने सत्ताधारी नगरसेवक व माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी नगराध्यक्षांनाच पालिकेच्या सभेवर धारेवर धरल्याने भुसावळच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. अमृत योजनेची पाईप लाईन टाकल्याने रस्त्यांची वाताहत झाल्याने लोक आम्हाला शिव्या घालत आहेत, जैन कंपनीच्या ठेकेदारावर काय कायदेशीर करणार, आम्ही येथे बोलायचे नाही तर काय विरोधकांप्रमाणे निवेदने द्यायची? असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित करीत जलकुंभाचे कामही पूर्ण न झाल्याने तीव्र संताप व्यक्त केला. नगराध्यक्ष रमण भोळे यांनी शासनाने एमजीपी या एजन्सीची नेमणूक केल्याचे सांगून माजी मंत्री एकनाथराव खडसे, आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत बैठकीतही या विषयावर चर्चा झाल्याचे सांगितले. ऑनलाईन कमी दराचे टेंडर जैन कंपनीचे असल्याने काम देण्यात आले त्यामुळे दिशाभूल करण्याचा प्रकार नसल्याचे त्यांनी सांगितले.
जनआधारच्या नगरसेवकांचा संताप
जनआधारच्या नगरसेविका निलिमा सचिन पाटील यांनी प्रभागातील फुटलेल्या पाईपलाईनबाबत संताप व्यक्त केला तर गटनेता उल्हास पगारे यांनी शहरातील रस्त्यांची वाताहत व अनियमित पाणीपुरवठ्याची तक्रार केली तसेच विरोधकांच्या वॉर्डात कामे होत नाहीत, पालिकेचे अधिकारी फोन उचलत नसल्याची तक्रार केली.
नगरसेवक कोठारींनी मांडला अभिनंदनाचा ठराव
नगरसेवक पिंटू कोठारी यांनी पालिकेचे पाणीपुरवठा अभियंता नितीन लुंगे फोन उचलत नसल्याने संताप व्यक्त करीत नगरसेवक युवराज लोणारी, मीनाक्षी नितीन धांडे, अमोल इंगळे यांनी पालिकेने आणलेल्या वृक्षांचे चांगले संगोपन करीत शहर सुशोभीकरण केल्याने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. यावेळी शहर विकासाच्या 35 विषयांना मंजुरी देण्यात आली.
