बोदवड शहरात धाडसी घरफोडी : सहा लाखांच्या रोकडसह 11 लाखांचा ऐवज लंपास
कुटूंब गच्चीवर झोपल्याची संधी चोरट्यांच्या पथ्थ्यावर : कापूस विक्रीची रक्कमही लांबवली
Daring house burglary in Bodwad City : Cash of 6 Lakhs along with 11 lakhs looted बोदवड : उन्हाळ्याच्या वाढत्या झळांमुळे गच्चीवर झोपण्यासाठी कुटूंब गेल्यानंतर चोरट्यांनी धाडसी घरफोडी करीत तब्बल सहा लाखांच्या रोकडसह 11 लाखांचा ऐवज लांबवल्याने बोदवड शहरातील खाटीकवाड्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. शहरातील मध्यवर्ती भागातील प्रभाग क्रमांक पाचमधील खाटीकवाड्यात शेतकरी व अंडापाव विक्रेते विलास सीताराम फाटे कुटूंबासह राहतात. उन्हाळ्यामुळे सर्व कुटूंबातील सदस्य सोमवारी रात्री गच्चीवर झोपले व ही संधी चोरट्यांनी साधत वरच्या मजल्याच्या दरवाजाला कडी लावून काम फत्ते केले. मंगळवारी पहाटे चार वाजता कुटूंबातील महिला लघूशंकेला उठल्यानंतर गच्चीचा दरवाजा उघडत असताना तो लॉक असल्याचे लक्षात आल्याने घरफोडीचा प्रकार उघडकीस आला.
11 लाखांचा ऐवज लंपास
चोरट्यांनी सोमवारी रात्री 12 वाजेनंतर मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून फाटे कुटूंबाच्या घरात प्रवेश केला. आधी कुटूंब गच्चीवर गाढ झोपेत असल्याची खात्री केल्यानंतर त्यांनी गच्चीचा दरवाजा आतून लॉक केला व त्यानंतर चोरट्यांनी कपाटातील सहा लाखांची रोकड तसेच 40 ग्रॅम वजनाचा चपला हार, 25 ग्रॅमचा सोन्याचा नेकलेस, 50 ग्रॅमची गहू मण्यांची पोत, सहा ग्रॅमच्या दोन अंगठ्या, 10 गॅ्रमचा गोफ असे एकूण 14 तोळ्यांचे सोन्याचे दागिणे व पाच हजार रुपये किंमतीचे देवघरातील चांदीचे देव मिळून 11 लाख पाच हजारांचा ऐवज लांबवला.

पोलीस अधिकार्यांची धाव
मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांच्यासह अधिकार्यांनी भेट दिली तसेच जळगाव पोलीस दलातील श्वान पथकाला पाचारण करण्यात आले मात्र श्वान जागेवरच घुटमळले. बोदवड पोलिसात विलास फाटे यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात कलम 380, 457 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. दुसर्या घटनेत शहरातील उजनी रस्त्यावरील विजय बडगुजर यांच्या शेतात महादेव मंदिरात असलेला पंचधातुचा अकरा किलो वजनाचा नाग ही चोरीला गेला. शहरात चोरीच्या घटना वाढल्याने नागरिक धास्तावले आहे. काही दिवसांपासून दुचाकी, पशुधन, मोबाईल, रस्त्यावरून रोकड लांबवण्याच्या घटना वाढल्याने नागरिक धास्तावले आहेत.
कापूस विक्रीची रक्कम चोरट्यांच्या घशात
फाटे या शेतकर्याने घरात 90 क्विंटल कापूस भाववाढीच्या आशेने साठवला मात्र आठ दिवसांपूर्वीच त्यांनी कापसाची विक्री केली व त्यातून आलेले पाच लाख 20 हजार व अंडा-पाव विक्रीच्या व्यवसायातील 80 हजार मिळून त्यांनी सहा लाख रुपये लाकडी कपाटात ठेवले होते व 5 मे 2024 रोजी मुलगा प्रतीकचे लग्न झाल्यानंतर सुनेचे 14 तोळ्याचे दागिणेही कपाटात ठेवल्याने मोठी संधीच चोरट्यांना उपलब्ध झाली.