जळगावातील सराईत गुन्हेगार भूषण माळी कोल्हापूरात स्थानबद्ध
जळगाव : सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्यांविरोधात पोलीस दलासह प्रशासनाकडून धडक कारवाई केली जात आहे. याच अनुषंगाने जळगावातील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगार भूषण उर्फ भासा विजय माळी (24, तुकारामवाडी) यास एमपीडीए कायद्यातंर्गत स्थानबद्ध करण्यात आले. जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आदेश काढल्यानंतर भूषण माळी याची कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.
13 गंभीर गुन्हे दाखल
भूषण माळी याच्याविरुध्द अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याची तुकारामवाडी व परिसरात प्रचंड दहशत असल्याने व गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्याला दोन वर्षांसाठी हद्दपार देखील करण्यात आले होते. हद्दपारीनंतर देखील त्याने गुन्हेगारी कृत्य सुरूच ठेवले होते. एकूण 13 गुन्हे संशयीताविरोधात दाखल आहेत.

कोल्हापूरात संशयीत स्थानबद्ध
तुकारामवाडी परिसरात भूषणसह त्याच्या साथीदारांनी एका घरात घुसून तोडफोड केलेली होती. त्याच्या गुन्हेगारी कारवायांवर आळा बसावा यासाठी त्याच्याविरुध्द एमआयडीसी पोलिस स्टेशनकडून एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पाठविण्यात आला होता. त्यांच्याकडून हा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे पाठविण्यात आला. गुरुवारी जिल्हाधिकार्यांनी त्याच्या स्थानबद्धतेचे आदेश पारीत केले. हा आदेश पारीत झाल्यानंतर भूषण माळीला कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.