आडगावात दोन कुटुंबात जुन्या वादातून हाणामारी : दोन्ही गटातील 15 जणांविरूध्द गुन्हा दाखल
यावल : यावल तालुक्यातील आडगाव येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाली. ही घटना गुरुवार, 30 मे रोजी सकाळी पावणेदहा वाजता घडली. मिरची पावडरचा वापर करण्यात आला. यावल पोलीस ठाण्यात एका गटाकडून 10 तर दुसर्या गटाकडून पाच जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
जुन्या वादातून मारहाण : मिरची पावडरही टाकली
आडगाव गावातील सुलोचनाबाई मच्छिंद्र पाटील (43) यांनी यावल पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, मागील भांडणाच्या कारणावरून संतोष उर्फ भाऊसाहेब प्रकाश पाटील, विजय प्रकाश पाटील, रमेश भास्कर पाटील, रवींद्र समाधान पाटील, कल्पना रमेश पाटील, सुशीला प्रकाश पाटील, भटू रामचंद्र पाटील, रुपाली भटू पाटील, माधुरी निलेश पाटील व अनिता भाऊसाहेब पाटील या दहा जणांनी त्यांना शिवीगाळ करून फिर्यादी महिला व तिचे पती, मुलगा यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून मारहाण केली आणि त्यांच्या गळ्यातील पोत तोडून नुकसान करीत ठार मारण्याची धमकी दिली. सुलोचनाबाई पाटील यांच्या फिर्यादीवरून 10 जणांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश महाजन करीत आहे.

दुसर्या गटाकडून पाच जणांविरूध्द गुन्हा
आडगाव गावातील भाऊसाहेब प्रकाश पाटील (36) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मागील भांडणाच्या कारणावरून मच्छिंद्र भागवत पाटील, मनोज मच्छिंद्र पाटील, सुलोचनाबाई मच्छिंद्र पाटील, रोशनी मच्छिंद्र पाटील व मोनिका मच्छिंद्र पाटील या पाच जणांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. लाकडी दांड्याने त्यांना मारून दुखापत केल्याने भाऊसाहेब पाटील यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.