भुसावळातील दुहेरी हत्याकांड : अकलूदच्या आरोपीला 6 पर्यंत पोलीस कोठडी
अन्य पसार आरोपींच्या मागावर पोलिसांची तीन पथके : वाल्मीक नगरात बंदोबस्त कायम
Double murder case in Bhusawal : Accused of Aklud remanded in police custody till 6 June भुसावळ : भुसावळातील दुहेरी हत्याकांडात वापरण्यात आलेले गावठी तीन पिस्टल अकलूद, ता.यावल येथील संशयीताच्या घरी ठेवण्यात आल्याचे तपासात समोर आल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी किरण कोळी (35) यास शनिवारी अटक केली होती. संशयीताला प्रचंड बंदोबस्तात भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात रविवारी दुपारी हजर केले असता न्यायालयाने 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, हत्याकांडातील अन्य पसार आरोपींच्या शोधासाठी जळगाव गुन्हे शाखेच्या एका पथकासह पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील दोन पथके मागावर आहेत.
शस्त्र लपवणार्या संशयीताला 6 पर्यंत कोठडी
भाजपाचे माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांची गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटकेतील तिघा संशयीतांना शहरातील तणावाची स्थिती पाहता संशयीतांना शुक्रवारी रात्री 11 वाजता प्रचंड बंदोबस्तात ऐनवेळी रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले. तिघांनाही स्वतंत्र वाहनांमधून न्यायालयात आणल्यानंतर रेल्वे न्यायालयाने 6 जूनपर्यंत तिघांना पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, अटकेतील आरोपी करण पथरोड याने इंदौर येथून आणलेली तीन गावठी पिस्टल अकलूद, ता.यावल येथील किरण कोळी (35) या संशयीताकडे ठेवल्याचे तपासात समोर आल्यानंतर या संशयीताला शनिवारी दुपारी अटक करण्यात आली. दुहेरी हत्याकांडातील आरोपींची संख्या आता चार झाली आहे.

अन्य संशयीताच्या मागावर तीन पथके
दुहेरी हत्याकांड प्रकरणी आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य संशयीताच्या अटकेसाठी तीन पथके संशयीताच्या मागावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शहरातील जामनेर रोडवरील वाल्मीक नगर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त अद्यापही कायम आहे.