भुसावळात चालकाला झोप आल्याने डिझेलचा टँकर उलटला

सुदैवाने जीवीतहानी टळली : महामार्गावरील घटना : लोकांनी वाहिले डिझेल


The diesel tanker overturned when the driver fell asleep in the bush भुसावळ : जळगावकडून नागपूरकडे डिझेल घेवून निघालेल्या भरधाव टँकरवरील चालकाला झोप आल्याने टँकर महामार्गावरील राजस्थानमार्बलजवळील सर्व्हिस रोडखाली उतरून उलटल्याची घटना सोमवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास शहरात घडली. सुदैवाने या घटनेत जिवीतहानी टळली असलीतरी चालक मात्र जखमी झाला आहे. अपघातानंतर टँकरमधील डिझेल सर्व्हिस रस्त्यावरील गटारीत वाहून गेल्याने नागरिकांनी ते मिळेल त्या साधनांनी वाहून नेले. बाजारपेठ पोलिसांनी रात्रीच अपघातस्थळी धाव घेतली. महामार्गाच्या बाजूला अपघात झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला नाही.

झोप आल्याने उलटला टँकर
सूत्रांच्या माहितीनुसार, जळगावकडून नागपूरकडे भरधाव वेगाने डिझेलचा टँकर (एन.एल.01 ए.एफ.1574) जात असताना महामार्गावरील राजस्थान मार्बलजवळ सोमवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास चालक ऋषीकेश पटेल (जामनगर, गुजरात) यास झोप आल्याने त्याचे टँकरवरील नियंत्रण सुटले व टँकर महामार्गावरील एका खांबाला धडकून सर्व्हिस रस्त्यावर आला व उलटला. अपघातानंतर टँकरमधून डिझेलची गळती सुरू झाली. टँकरमधील डिझेल सर्व्हिस रोडच्या गटारीत जावून साचल्याने नागरिकांनी मिळेल त्या साधनांनी डिझेल पळवले. नागरिकांनी 112 क्रमांकावर फोन केल्यानंतर बाजारपेठ पोलीस ठाण्याचे हवालदार अन्वर शेख व कॉन्स्टेबल तौफिक शेख यांनी अपघातस्थळी धाव घेतली. मध्यरात्री उशिरा टँकर रस्त्यावर उभे करण्यात आले. सुदैवाने महामार्गाच्या कडेला अपघात झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली नाही तसेच जीवीतहानी झाली नाही. चालक ऋषीकेश पटेल यास नागरिकांनी रात्रीच ट्रामा सेंटरमध्ये उपचारार्थ हलवले. अपघातप्रकरणी नोंद नसल्याचे बाजारपेठ पोलिसांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !