भुसावळात पावसाच्या बरसल्या सरी : उकाड्यापासून दिलासा
भुसावळ : उष्णता व उकाड्याने हैराण झालेल्या भुसावळकरांना गुरुवारी दुपारी अर्धा तास झालेल्या पावसामुळे दिलासा मिळाला. यंदा मान्सुनचे शहरात 7 जूनपूर्वीच आगमन झाल्याचे दिसून आले. सोमवार, 3 जून रोजी सायंकाळी झालेल्या वादळी पावसानंतर गुरुवार, 6 रोजी दुपारी अडीच वाजतादेखील अचानक वातावरण बदल होवून पावसाला सुरूवात झाली. पावसाचा जोर नसलातरी सुमारे अर्धा तास चाललेल्या पावसामुळे शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचले होते. गुरुवारचा पाऊस 0.8 मिलीमीटर झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
तापमानाचा पारा घसरला
संपूर्ण मे महिना शहराचे तापमान 42 ते 44 अंशावरच राहिल्याने शहरवासी घामाच्या धारांनी न्हावून निघाले तर उष्णतेमुळेदेखील जनजीवनावर व व्यापारीपेठेवरही परिणाम झाला होता मात्र जुनच्या प्रारंभापासून तापमानात मोठी घसरण झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. यंदा 7 जूनपूर्वीच शहरात मान्सुनचे आगमन झाले. सोमवार, 3 जून रोजी तब्बल 51 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी गुरुवार, 6 रोजी पुन्हा पावसाने हजेरी दिली. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अचानक वातावरणात गारवा निर्माण होवून पावसाला सुरूवात झाली. पावसाचा जोर नसलातरी हलक्या सरी बरसल्या.


सुमारे अर्धा तासांपेक्षा अधिक काळ पाऊस बरसला. मान्सुनपूर्व पावसामुळे शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला असून लवकरच पेरणीला सुरूवात होण्याची आशा आहे. शहरातील बसस्थानकात पावसामुळे तळे साचल्याने प्रवाशांना मनस्ताप सोसावा लागला तर शहरातील नालेसफाईचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे. गुरुवारी शहराचे तापमाने 41.8 तर किमान तापमान 28.5 अंश असल्याचे सूत्रांनी सांगितले. तापमानाचा पारा 44 अंशावर 41 अंशावर आल्याने नागरिकांना मोठा दिलासा यानिमित्त मिळाला आहे.