भुसावळातील दुहेरी हत्याकांडातील आरोपींवर कठोर कारवाई करा : भुसावळ शहर मोर्चाने दणाणले


भुसावळ : भुसावळातील भाजपाचे माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांची निर्घूण हत्या झाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी वाल्मिकी, बौद्ध, मातंग, वडर व मेहतर समाज बांधवांनी एकत्रीत होत जामनेर रोडवरील वाल्मीक नगरापासून शुक्रवार, 7 जून रोजी सकाळी 11 वाजता प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चेकर्‍यांनी जोरदार घोषणाबाजी केली तसेच फलकांद्वारे आपल्या मागण्या दर्शवल्या. यावेळी प्रांताधिकारी कार्यालयात जितेंद्र पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. भुसावळातील दुहेरी हत्याकांडाची सीबीआय चौकशी करावी, हत्याकांडात जर बडा राजकीय नेता असल्यास त्याचे नाव जाहीर करावे, अशी मागणी मोर्चेकर्‍यांनी यावेळी केली.

मोर्चेकर्‍यांच्या घोषणांनी दणाणले शहर
भुसावळातील माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांची बुधवार, 29 मे रोजी रात्री साडेनऊ वाजता जुना सातारा भागातील मरिमाता मंदिराजवळ हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर समाजबांधवांमध्ये प्रचंड रोष असून बुधवार, 5 जून रोजी महिलावर्गाने प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता व त्यानंतर पुन्हा शुक्रवार, 7 रोजी सकाळी 11 वाजता जामनेर रोडवरील वाल्मीक नगरापासून मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकर्‍यांनी दुहेरी हत्याकांडातील संशयीतांना फाशी द्यावी, त्यांच्या घरावर बुलडोझर चालवावे, भुसावळातील दादागिरी मोडून काढावी, पसार संशयीतांना अटक करावी आदी मागण्या फलकांद्वारे दर्शवत जोरदार घोषणाबाी केली. या घोषणांनी शहरातील रस्ते व प्रांताधिकारी कार्यालय दणाणले होते.

प्रांताधिकार्‍यांना निवेदन
वाल्मीक नगरापासून सुरू झालेला मोर्चा जामनेर रोड, पांडुरंग टॉकीज, बाजारपेठ पोलीस ठाण्यासमोरील लोखंडी पूलाखालून हंबर्डीकर चौकात आला व तेथून महात्मा गांधी पुतळ्याकडून तहसील कार्यालयावरून थेट प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चातील शिष्टमंडळाने प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना निवेदन देत सर्व संशयीतांना अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. यावेळी बाजारपेठ पोलीस निरीक्षक गजानन पडघन, शहरचे निरीक्षक संदीप रणदिवे, शहर वाहतूक शाखेच्या सहायक निरीक्षक रुपाली चव्हाण यांनी चोख बंदोबस्त राखला.

वाल्मीक नगरात बंदोबस्ताची मागणी
रविवार, 9 जून रोजी वाल्मीक नगरात स्व.संतोष बारसे यांचे उत्तरकार्य असून या दिवशी या भागात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करावा, पोलिसांची गस्त सुरू करावी, वाल्मीक नगरासमोरील बंद पोलीस चौकी सुरू करावी, अशी मागणी केली. दुहेरी हत्याकांडाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून संशयीतांविरूध्द मोक्का कायद्यान्वये कारवाई करावी,  अशी मागणी करण्यात आली. हत्याकांडातील उर्वरीत संशयीतांना सात दिवसांच्या आत अटक करावी अन्यथा मेहतर समाजातर्फे शनिवार, 15 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. पाचशेहून अधिक समाजबांधव मोर्चात सहभागी झाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !