कोळन्हावी फाट्याजवळ अवैधरित्या गोवंश वाहतूक करणारे वाहन जप्त
यावल : यावल तालुक्यातील कोळन्हावी फाट्याजवळ मध्य प्रदेशातून एका वाहनात अत्यंत निर्दयीपणे गुरांची वाहतूक करणार्या वाहनास यावल पोलीसांनी पकडले. ही कारवाई मंगळवारी सकाळी करण्यात आली. वाहनातील पाच गुरांची सुटका करण्यात आली. त्यांची गोशाळेत रवानगी करण्यात आली. अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
गोवंश वाहतूक ऐरणीवर
यावल तालुक्यातील किनगाव जळगाव मार्गावरील कोळन्हावी फाटा आहे. या फाट्याजवळील ना.धों.महानोर स्कूलजवळ वाहन (क्रमांक एम.पी. 46 जी. 3107) याव्दारे अज्ञात वाहनचालक अवैधरित्या गोवंश हत्येच्या हेतूने वाहनात निर्दयीपणे कोंबून वाहतूक करीत होता. या वाहनात पाच गुरे होती. वाहन हे रस्त्याच्याकडे फसले व स्थानिक नागरीकांच्या निदर्शनास हा प्रकार आला व त्यांनी यावल पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना माहिती दिल्याचे पाहुन व अज्ञात वाहन चालक हा तेथुन वाहन सोडून पसार झाला दरम्यान या वाहनातून पोलीस व नागरीकांच्या मदतीने पाच गुरांची सुटका करून त्यांना मननेल, ता.यावल येथे गोशाळेत पाठविण्यात आले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुध्द प्राणी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी उमेश महाजन व पोलीस करीत आहे.

