अवैध वाळू वाहतूक ऐरणीवर : विरावलीत ट्रॉलीचे टायर फुटल्याने वाळूचे ट्रॅक्टर फसले
यावल : यावल तालुक्यातील विरावली येथे एका विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरला ट्रॉली लावून अवैधरित्या वाळू वाहतूक केली जात असताना अचानक ट्रॉलीचे टायर फुटले व ट्रॅक्टर अडकले. त्यात वाळू असल्याचे पाहून नागरीकांनी महसूल विभागास माहिती दिली व महसूलच्या पथकाने ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केली. ही कारवाई सोमवारी करण्यात आली.
ट्रॅक्टर मालकाला दंडाची नोटीस
विरावली, ता.यावल या गावाजवळ मुक्ताबाई प्रकाश कोळी (शिरसाड) यांच्या मालकीचे विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरला ट्रॉली जोडून त्यात एक ब्रास वाळूची वाहतूक होत असताना सोमवारी दुपारी ट्रॉलीचे टायर फुटले व ट्रॅक्टर एका ठिकाणी अडकले. रस्त्यात अडकलेल्या या ट्रॅक्टरमध्ये वाळू आहे हे पाहून नागरीकांनी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी माहिती दिली. निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, तलाठी ईश्वर कोळी, तलाठी प्राजक्ता पाटील, तलाठी श्वेता ससाणे, तलाठी हेमंत मारोडे, तलाठी वसीम तडवी, कोतवाल विजय साळवे हे पथकासह तेथे दाखल झाले व पंचनामा करून ट्रॅक्टर ताब्यात घेत तहसील कार्यालयात आणण्यात आले. ट्रॅक्टर मालक यांना दंडा संदर्भात नोटीस बजावण्यात आली.

