भुसावळात खोदकामामुळे ओएफसी केबल तुटल्याने इंटरनेट बंद


भुसावळ : राष्ट्रीय महामार्गावर चौदपदरीकरणाचे काम सुरू असतानाच सोमवारी सकाळी ओएफसी केबल तुटल्याने शहरात इंटरनेट व दूरध्वनी सेवा प्रभावीत झाल्याने ग्राहकांचे चांगलेच हाल झाले तर पोस्टालाही या सेवेमुळे मोठा फटका बसला. सायंकाळी पाच वाजेनंतर सेवा सुरळीत करण्यात यंत्रणेला यश आले. बीएसएनएल ब्रॉडबँड सेवेबाबत सातत्याने तक्रारी असतानाच महिन्यात तिसर्‍यांदा सेवा प्रभावीत झाल्याने ग्राहकांमधून या विभागाच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली. गेल्या महिन्याभरात यापूर्वी दोनवेळा याच पध्दतीने महामार्गावर तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने इंटरनेट सेवा खंडीत झाली होती. या पाठोपाठ सोमवारी सलग तिसर्‍यांदा हा प्रकार घडला. बीएसएनएलचे इंटरनेट सेवा बंद असल्याने शहरातील मॉडर्न रोडवरील मुख्य डाक घर सोबत शहरातील उपविभागीय डाक घरांमधील सेवा पूर्णपणे ठप्प झाली तर बहुतांश बँकांच्या कामावर परीणाम झाला. बीएसएनएल ब्रॉडबँड कनेक्शनला पर्यायी ब्रॉडबँड सेवा वापर करून व्यवहार पूर्ण करावे लागले. इंटरनेट कॅफे, सुविधा केंद्र, सीएससी केंद्रांमधील कामकाजावर परिणाम झाला. शहरातील ग्राहकांनी याबाबत दुरसंचार विभागाला तक्रारी करूनही माहिती दिली जात नव्हती. इंटरनेट सेवा पूर्ववत कधी सुरु होणार? या प्रश्नावर कर्मचार्‍यांनी केवळ बिघाड दुरुस्तीचे काम असल्याचे उत्तर देण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !