अट्रावलच्या संशयीताकडून हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघण : संशयीताला सोडले गुजरात राज्यात
यावल : यावल तालुक्यातील अट्रावल येथील एका 45 वर्षीय इसमाला एक वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश फैजपूर प्रांतांनी काढले होते. या आदेशाचे उल्लंघण करीत संशयीत यावल शहरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावल पोलिसांच्या पथकाने इसमास बुधवारी शेतकी संघाच्या मागुन ताब्यात घेतले व त्याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात हद्दपारीचे उल्लंघण केल्याचा गुन्हा दाखल करून त्यास गुरूवारी पुन्हा त्याला गुजरात राज्याच्या हद्दीत सोडले.
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघण
अट्रावल, ता.यावल येथील अशोक गोवर्धन तायडे उर्फ भाई (45) यांना 17 एप्रिल 2024 रोजी फैजपूर प्रांताधिकारी यांनी एक वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले होते व पोलिसांच्या पथकांनी त्यांना गुजरात राज्यातील सुरत शहरात सोडले होते. दरम्यान ते कुठल्याच प्रकारची परवानगी न घेता यावल शहरात दाखल झाले होते व याबाबत यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी, उपनिरीक्षक मुजफ्फर खान, हवालदार संदीप सूर्यवंशी, पोलीस नाईक किशोर परदेशी, अशोक बाविस्कर, सुशील घुगे, योगेश खोंडे, अल्लौद्दीन तडवी, निलेश वाघ यांच्या पथकास तायडे यांचा शोध घेण्याच्या सुचना केल्या. बुधवारी दुपारी तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या मागुन संशयीताला ताब्यात घेत हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल रकण्यात आला. पथकाने गुरूवारी दुपारी दोन वाजेला गुजरात राज्यातील सुरत येथे संबंधिताला सोडले. सुरत पोलिसांकडे देखील या संदर्भातील नोंद करून त्यांना पुन्हा वर्षभर जळगाव जिल्ह्यात प्रवेश करू नये अशा सक्त सूचना देण्यात आल्या.

