रावेरात दहा वर्षांपूर्वी अपघात : बर्हाणपूरच्या ट्रक चालकास सहा महिन्यांची शिक्षा
रावेर : दहा वर्षांपूर्वी झालेल्या अपघातातील आरोपीस सहा महिने कैद व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा रावेर न्यायालयातर्फे सुनावण्यात आली.
असे आहे अपघात प्रकरण
22 जानेवारी 2014 रोजी शहरातील ओम मार्बलसमोर ट्रक (क्र.एम.एच.19 झेड.4351) वरील चालक शेख शकील शेख भुरा (बर्हाणपूर) याने सायंकाळी उशिरा त्याच्या ताब्यातील ट्रकचे लाईट बंद असतांना वाहन जोरात चालवून दुचाकी (एम.एच.19 बीएफ 2507) ला धडक दिली. दुचाकीस्वार रतनलाल धीवपाल सैनी यांचा या अपघातात मृत्यू ओढवला. याप्रकरणी सुरेशकुमार सैनी यांनी फिर्याद दिल्यावरून रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अधिकारी उपनिरीक्षक डी.सी.जगताप यांनी आरोपींविरुद्ध पुरावे गोळा केले. आरोपीस न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने आरोपीस सहा महिने कैद व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. दंड न भरल्यास पंधरा दिवसाची कैद भोगावी लागणार आहे.

