भुसावळ तालुक्यात विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतीक्षा


भुसावळ : भुसावळ शहरातील व ग्रामीण भागातील शाळा मिळून 63 हजार 555 विद्यार्थी पटावर आहे मात्र शाळेच्या पहिल्याच दिवशी 37 हजार 312 विद्यार्थी शाळेत हजर होते तर 26 हजार 243 विद्यार्थी गैरहजर राहिले. एकाही विद्यार्थ्याला गणवेश न मिळाल्याने पहिल्या दिवशी गणवेश वितरणाचा फज्जा उडाला. शनिवारपासून शहरासह तालुक्यातील सर्वच प्राथमिक, माध्यमिक शाळा सुरू झाल्या. नवीन शैक्षणिक वर्षाला सुरूवात झाली. सकाळ आणि दुपारच्या सत्रात शाळेच्या वेळेनुसार विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्रवेशद्वारावरच स्वागत करण्यात आले.

शाळांची पहिल्याच दिवशी तपासणी
शिक्षण विभागाकडून शाळेची पहिल्याच दिवशी तपासणी करण्यात आली. यात शाळेतील स्वच्छता, शालेय पोषण आहार शाळेतील भौतीक सुविधा यांची तपासणी करण्यात आली. शाळेच्या पहिल्याच दिवशी पालकांची सभा घेण्यात आली. त्यात त्यांना नवीन शैक्षणिक धोरणाची माहिती दिली. गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, परिवेक्षाधिन जिल्हाधिकारी वेवो, शिक्षण विस्तार अधिकारी बी.डी.धाडी आदींनी शाळांना भेटी देत सूचना केल्यात.



शंभर टक्के पुस्तकांचे वितरण
शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके वितरीत करण्यात आली. शहरासह ग्रामीण भागातील 27 हजार विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वितरण शाळांमध्ये करण्यात आले. जे विद्यार्थी शाळेत आले त्यांना पुस्तके देण्यात आली तर सुमारे शंभर टक्के पुस्तकांचे वितरण झाल्याचे शिक्षण विभागाने सांगितले. प्रत्येक शाळेतील जे काही 5 ते 10 विद्यार्थी राहिले असतील, त्यांनाही पुस्तके मंगळवारी दिली जातील.

किन्हीत पालक मेळावा
किन्ही येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा प्रवेशोत्सव व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना अधिकार्‍यांच्या हस्ते पाठ्यपुस्तके, स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. इयत्ता पहिलीसाठी नव्याने प्रवेश घेतलेल्या नवागतांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी शालेय पोषण आहार धान्याच्या मालाची तपासणी करण्यात आली तसेच शालेय रेकॉर्ड तपासण्यात आले.

सुनसगावला बैलगाडीवर मिरवणूक
सुनसगाव येथील दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालयामध्ये शाळा प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या मुलांची बैलगाडी सजवून गावातून ढोल-ताशांच्या गजरामध्ये त्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मुलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांची वेशभूषाही केली. प्रभात फेरीनंतर शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी औक्षण केले नंतर मुलांनी प्रवेशद्वारावरच शाळेला व गुरुजनांना वंदन केले. त्यानंतर प्रत्येक मुलाने स्टेजवर जाऊन महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून वंदन केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !