रावेरात काकाचा पुतण्यावर चाकूने प्राणघातक हल्ला
पुतण्या गंभीर जखमी : मद्य पिण्याचा जाब विचारल्यातून घटना
रावेर : काका घरात मद्य पिण्यासाठी लोकांना घेऊन बसतो याचा जाब विचारल्याच्या कारणावरून काकाने पुतण्याच्या छातीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी रात्री रावेर शहरात घडली. याबाबत रावेर पोलिसात गुन्हा नोंद होताच काकास पोलिसांनी अटक केली.
असे आहे नेमके प्रकरण
रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास सुभाष उर्फ बाळू गोविंदा महाजन हा काही लोकांबरोबर घरात मद्य पित होता. या वेळेस त्यांचा पुतण्या रवींद्र मुरलीधर महाजन याने संताप व्यक्त करीत दारूबाबत जाब विचारल्यानंतर दोघात वाद झाला. काकाने पुतण्या रवींद्र महाजन (40) याच्या छातीवर चाकू मारल्याने रवींद्र हा गंभीर जखमी झाला. याबाबत सुरेखा दिलीप महाजन यांनी रावेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून सुभाष महाजन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यास अटक केली. तपास पोलीस निरिक्षक आशिषकुमार अडसुळ करीत आहेत. गंभीर जखमी रवींद्र यास येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ जळगावी हलवण्यात आले.

