भुसावळात मदतीच्या बहाण्याने वयोवृद्धेचे 87 हजारांचे दागिने लांबवले


भुसावळ  : पीडीत महिलेला आपण सर्व मिळून मदत करू, असे भासवत 65 वर्षीय वयोवृद्धेचा विश्वास संपादन करीत तिला बोलण्यात गुंतवून तिच्या गळ्यातील 87 हजारांचे दागिने लांबवण्यात आले. शहरातील जामनेर रोडवरील अष्टभूजा देवी जवळील गल्लीत ही घटना 3 मे रोजी सायंकाळी सहा वाजता घडली. याप्रकरणी अज्ञात दोन महिलांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा शनिवारी दाखल करण्यात आला.

दोन महिलांविरोधात गुन्हा
आशा वसंत निळे (65, आवटे नगर, साकरी फाटा, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, 3 मे रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास त्या जामनेर रोडवरून पायी जात असताना दोन अनोळखी महिलांनी त्यांना अडवत एका पीडीतेवर अन्याय झाल्याने तिला मदत करू, असे म्हणत अष्टभूजा डेअरीमागील गल्लीत नेले.

वृद्धेला बोलण्यात व्यस्त ठेवत तिची नजर चुकवून गळ्यातील 10 ग्रॅमची सोन्याची पोत, 10 ग्रॅमची अन्य दुसरी सोन्याची पोत, चार ग्रॅमचे कानातले, तीन ग्रॅमचे कानातील वेल व दोन ग्रॅमची सोन्याची अंगठी असा एकूण 87 हजारांचा ऐवज लांबवला. 22 जून रोजी आशा निळे यांनी बाजारपेठ पोलिसात तक्रार दिल्यावरून अज्ञात दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार निलेश चौधरी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !