फैजपूर शहरात बस चालकाला मारहाण : संशयीताला पोलिसांकडून अटक
यावल : फैजपूर शहरातील छत्री चौकात साईट देण्याच्या कारणावरून एस.टी.बस चालकाला चारचाकी वाहन चालकाने अडवत कॉलर ओढून, शिवीगाळ करीत मारहाण केली. चालकाने एस.टी. बस ही बसस्थानकात आणल्यानंतरही बसस्थानकात येऊन चालकाच्या कानशिलात लगावून शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आला व चालकाला ठार मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना सोमवारी सकाळी घडली. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. जखमी चालकास उपचाराकरीता यावल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आरोपीला चारचाकी चालकास अटक
फैजपूर शहरातील छत्री चौकात भुसावळ एस.टी.आगारातील चालक सुधाकर रूपचंद अटक (41, रा.खडका, ता.भुसावळ) हे सोमवारी सकाळी सात वाजता एस.टी. बस (क्रमांक एम. एच. 40 एन. 9876) घेऊन भुसावळ ते लोहारा जात होते. फैजपूर शहरात छत्री चौकात ते आले असता त्यांच्या पाठीमागून एक महिंद्रा कंपनीची चारचाकी कार (क्रमांक एम. एच. 09 डी. एक्स. 1315) वरील चालक मोहम्मद अमीर मोहम्मद आरिफ (रा.फैजपूर) हे आले आणि त्यांनी एस.टी.बस अडवून चालकास बसचा दरवाजा उघडून त्यास बाहेर ओढत शिविगाळ करून मारहाण केली.

चालकाने एस.टी. बस फैजपूर बसस्थानकात आणली तेथे देखील त्यास कार चालकाने येवून शिवीगाळ करून कानशिलात मारून शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा व अन्य कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला. दुखापत झालेल्या चालकावर यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत जावळे, डॉ.उमेश अडबलवाड, अधिपरिचारीका माधुरी ठोके, बापू महाजन आदींनी उपचार केले.
