आसोद्यातील शेतकर्याचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू
छेडखानीनंतर घटनेचा संशय तर पैसे देण्यावरूनही वाद झाल्याचा दावा
Aasoda Bhagwat Dagdu Bhangale Murder जळगाव : मुलीची छेड काढल्याच्या संशयानंतर जमावाने केलेल्या मारहाणीत आसोद्याच्या 43 वर्षीय शेतकर्याचा मृत्यू झाला. जळगाव तालुका पोलीस स्टेशनला सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, मृताविरोधातदेखील विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. छेडखानीवरून जमावाने मारहाण केल्याचा एकीकडे दावा होत असताना दुसरीकडे मृताच्या भावाने मात्र दहा हजारांची उचल मागितली होती व ती देण्यापूर्वीच जमावाने मारहाण केली.
बेदम मारहाणीत शेतकर्याचा मृत्यू
असोदा येथे गुरुवार, 4 जुलै रोजी दुपारी साडेअकरा ते बारा वाजेच्या दरम्यान गावातील गोकुळ नगर भागात मुलीची छेड काढल्याच्या संशयावरून काही महिला व पुरुषांनी भास्कर उर्फ भागवत दगडू भंगाळे (43) या शेतकर्याला बेदम मारहाण केली. ग्रामस्थांना ही माहिती कळताच त्यांनी भंगाळे यांची सुटका करीत जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता भास्कर भंगाळे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
शेतकर्याच्या मृत्यू प्रकरणी आसोदा पोलीस पाटील आनंदा सिताराम बिर्हाडे (वय 52) यांच्या फिर्यादीवरून नवीन कायदा भारतीय न्याय संहिता नुसार 189(2), 191(2), 190, 115(2), 352, 103(1) नुसार खुनाचा व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपी म्हणून सोन्या रवींद्र कोळी, शुभम कैलास कोळी, महेंद्र गोरखनाथ कोळी, भैय्या उर्फ योगेश रवींद्र कोळी, हेमंत रवींद्र कोळी, रवींद्र एकनाथ कोळी, अनिता प्रकाश कोळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मयत शेतकर्याविरोधातही गुन्हा
दुसरीकडे 22 वर्षीय मुलीची छेड काढल्यानुसार विनयभंगाचा गुन्हा मयत भास्कर भंगाळे यांच्यावर देखील तालुका पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे.
