कोळन्हावीजवळ दुचाकी घसरून महिलेचा मृत्यू : पतीचा मन हेलावणारा आक्रोश
यावल : यावल तालुक्यातील डांभूर्णी येथून केळीचे घड घेऊन शेतामध्ये मजुरीसाठी जात असलेल्या महिलेचा दुचाकी घसरल्यामुळे मृत्यू झाला. हा अपघात कोळन्हावी गावाजवळ सोमवार, 15 जुलै रोजी घडला. तुळसाबाई रमेश भील (25, रा.विष्णापूर, ता.चोपडा) असे मयताचे नाव आहे. चिमुकल्या मुलांच्या डोळ्यादेखत हा अपघात झाला व दोन्ही चिमुकल्यांचे मातृछत्र हरपल्याने विष्णूपूर गावात शोककळा पसरली. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
दुचाकी घसरल्याने अपघात
तुळसाबाई या पती, मुलगा, मुलगी यांच्यासह वास्तव्यास होती. पतीसह मजुरी काम करून तिचा उदरनिर्वाह सुरू होता. सोमवार, 25 जुलै रोजी नेहमीप्रमाणे डांभूर्णी येथून शेतामध्ये तुळसाबाई, त्यांचे पती रमेश आणि चार वर्षांची मुलगी गायत्री शेतात मजुरीसाठी जात असताना कोळन्हावी गावाजवळ त्यांची दुचाकी घसरून अपघातात तुळसाबाई रस्त्यावर पडताच त्यांच्या डोक्याला जबर ईजा झाली. त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. डोळ्यासमोरच अपघातात पत्नी गेल्यामुळे पतीने मन हेलावणारा आक्रोश केला. दोन्ही मुले आईच्या मायेला पोरकी झाल्यामुळे यावल आणि चोपडा तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात आली.

