पाल वृंदावन धाम आश्रमात गुरुपौर्णिमेची जय्यत तयारी

महाराष्ट्र व मध्यप्रदेशातून आज पायी दिंडी दाखल होणार


पाल, ता.रावेर : अखिल भारतीय चैतन्य साधक परिवार तथा सातपुड्यातील गोर-गरीबांचे सदगुरू प.पू.ब्रम्हलीन संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी आश्रम, वृंदावम धाम, पाल येथे सालाबादाप्रमाणे रविवार, 21 जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येणार असून महोत्सवानिमित्त तयारीला वेग आला आहे. दरम्यान, महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातून शनिवारी दिंडी दाखल होणार आहेत.

लाखोंच्या संख्येने भाविक येणार
परम पूज्य ब्रम्हलीन संत श्री लक्ष्मण चैतन्य बापुजी यांच्या स्मृती तसेच गुरु शिष्याचे अटूट बंधन असलेल्या अ.भा.चैतन्य साधक परिवार देशभरातून दरवर्षी लाखोंच्या संख्येने येवून गुरुपौर्णिमा साजरी करतात. पाल आश्रमाचे विद्यमान गादीपती श्री गोपाल चैतन्यजी महाराज यांच्या सनिध्यात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. रविवार, 21 जुलै रोजी पाल आश्रमातून किमान दीडशे ते दोनशे किलोमीटरवर असलेल्या मध्यप्रदेशतील चारुकेश्वर आश्रम व महाराष्ट्रातील औरंगाबाद, कन्नड, सोयगाव, जामनेर येथून हजारो भाविक पायी दिंडी घेऊन पाल आश्रमात दाखल होणार आहेत.

भाविकांसाठी चोख व्यवस्था
गुरुपौर्णिमा महोस्तवानिमित्त येणार्‍या लाखो भाविकांच्या राहण्याची तसेच भोजन, सत्संग पंडाल व्यवस्थेची तयारी करण्यात येत आहे त्याच प्रमाणे आरोग्य उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. पाल ग्रामपंचायत प्रशासनाने स्वच्छता तसेच पोलीस प्रशासनाने कायदा-सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी नियोजन केले आहे. रावेर आगारातर्फे जादा बस सेवा पुरवली जाणार आहे तर महावितरणतर्फे वीजपुरवठा अखंडित ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे.

50 हजारांवर भाविक येणार
गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त प.पू.सदगुरू संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजींच्या समाधी दर्शनार्थ देशभरातून दरवर्षाप्रमाने यंदा किमान 50 हजारांच्या आसपास भाविक पाल येथे दाखल होणार आहेत. पायी दिंडीच्या स्वागताकरीता आश्रमाचे पदस्थ व संत समितीचे प्रदेश अध्यक्ष श्रद्धेय संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज यांच्यासह ब्रम्हचारी संत श्री दिव्य चैतन्य, श्री शिव चैतन्य, श्री नवनीत चैतन्य, श्री ब्रज चैतन्य, श्री ऋषी चैतन्य, श्री हरीश चैतन्य, श्री शोभाराम चैतन्य महाराज जाणार आहे. पायी दिंडीत येणार्‍या साधकांना चैतन्य साधक परिवार समितीतर्फे ठिकठिकाणी राहण्यासह भोजनाची व्यवस्था करण्यात येते.

आज दिंडीचे आगमन : विद्यार्थ्यांचा सत्कार
शनिवार, 20 जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त पाल वृंदावन धाम आश्रमात सायंकाळी सात वाजेपासुन सत्संग, भजन संध्या, तसेच सेवा देणार्‍या विविध समितीचे स्वागत होईल शिवाय दहावी-बारावीत अव्वल आलेल्या विद्यार्थांचा गुणगौरव करण्यात येणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !