कोणत्याही परिस्थितीत खोके सरकार घालवणार ! खासदार संजय राऊत
मुंबई (9 ऑगस्ट 2024) : कोणत्याही परिस्थितीत राज्यातील खोके सरकारला घालवून, भाजपला हद्दपार करू, असा निर्धार खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अद्याप ठरलेला नसलातरी तिन्ही पक्ष एकत्र याबाबत निर्णय घेतील, असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
तीन्ही पक्ष मिळून निर्णय घेतील
खासदार राऊत म्हणाले की, निवडणुकीत राज्याला एक चेहरा द्यावा लागतो. विरोधक आणि सत्ताधारी दोघांकडे तो चेहरा असावा लागतो मात्र महाविकास आघाडीमध्ये अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही. तिन्ही पक्ष एकत्र मिळून निर्णय घेतील, असे राऊत म्हणाले. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत ज्या पक्षाला जास्त जागा मिळतील त्यांचाच मुख्यमंत्री असेल, असे महाविकास आघाडीचे सूत्र असल्याचे विधान केल्यानंतर या संदर्भात राऊत यांना छेडले असता त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे काही वेगळे मत असू शकते. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असल्याचे म्हटले.
राहुल गांधी हेच इंडिया आघाडीचा चेहरा
राष्ट्रीय पातळीवर विचार करता राहुल गांधी हेच इंडिया आघाडीचा चेहरा आहेत. त्याचप्रमाणे राज्य पातळीवर उद्धव ठाकरे हे सातत्याने कोणतीही पर्वा न करता मोदी आणि शहा यांच्या विरोधात आवाज उठवत आहेत”, असे सूचक विधान संजय राऊत यांनी केले.