यावल तहसीलबाहेर निळे निशान संघटनेचे ठिय्या आंदोलन
प्रशासनाने दखल न घेतल्याने आंदोलन कायम
यावल (13 ऑगस्ट 2024) : यावल तहसील कार्यालयात निळे निशान सामाजिक संघटनेकडून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी डॉक्टर नेमावा तसेच गेल्या दोन वर्षांपासून येथील पंचायत समितीकडे टेंभी कुरण व धुळे पाडा आदिवासी वस्तीच्या समस्या मांडूनदेखील समस्या सुटत नसल्याने संघटनेकडून सोमवारपासून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. दिवसभरात आंदोलनाची दखल न घेतल्याने आंदोलन कायम आहे.
ठिय्या आंदोलनाने उडाली खळबळ
निळे निशाण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसील कार्यालयात सोमवारपासून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. तालुकाध्यक्ष विलास तायडे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल इंधाटे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी हे बेमुदत आंदोलन सुरू केले. प्रसंगी देण्यात आलेल्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, ग्रामीण रुग्णालयात दररोज 500 रुग्णांची तपासणी केली जात असल्याची माहिती संघटनेला देण्यात आली. या 500 रुग्णांची तपासणी कोणते डॉक्टर करतात ? असा प्रश्न आहे शिवाय रुग्णालयात गरजू महिलांना प्रसूती दरम्यान सीझर करण्याची वेळ आल्यास रुग्णालयात तज्ज्ञ स्त्रीरोग डॉक्टरांची नियुक्ती करायला पाहिजे.अशी त्यांची मागणी आहे तसेच गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांच्याकडे विविध समस्यांबाबत लेखी तक्रारी, निवेदन दिले. टेंभी कुरण व धुळे पाडा येथील बौद्ध, दलित, आदिवासींच्या समस्या सोडवण्यात आल्या नाही म्ह,णून आंदोलन करण्याची वेळ आल्याचे आंदोलकांनी सांगितले.

नाशिक आयुक्तांच्या ‘आदेशाची पायमल्ली’
तालुक्यातील टेंभीकुरण गाव ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट करण्याचा आदेश विभागीय आयुक्त यांनी 1992 मध्ये दिलेला असला तरी अद्याप गटविकास अधिकारी व संबंधित अधिकार्यांनी याबाबत कोणतीही दखल घेतलेली नाही. म्हणजे नाशिक आयुक्तांच्या ‘आदेशाची पायमल्ली’ करण्यात आली आहे. टेंभीकुरण येथील दलित, बौद्ध नागरिक, महिलांना वस्तीच्या बाहेर जाण्यासाठी कोणताही रस्ता व इतर सुख-सुविधा नाहीत.
