हतनूर-सावतर गावाचा शिवरस्ता तब्बल 25 वर्षांनी झाला मोकळा
तहसीलदारांचा पुढाकार : शेतकर्यांनी मनवला आनंदोत्सव
Hatnoor-Savatar village’s Shivrasta was cleared after almost 25 years भुसावळ (13 ऑगस्ट 2024) : हतनूर-सावतर या दोन गावांच्या शिवरस्त्याबाबत सुमारे 25 वर्षांपासूनचा असलेला वाद भुसावळच्या तहसीलदार निता लबडे यांच्या सामंजस्याने सुटला. शिवरस्ता मोकळा करण्यात यंत्रणेला महसूल पंधरवड्यात यश आल्याने आता सुमारे 300 वर शेतकर्यांनी आपला शेती माल थेट बाजारपेठेत वेळेत नेणे आता सुलभ झाले आहे.
25 वर्षांनंतर वाद निकाली
महसूल पंधरवड्यानिमित्त महसूल प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवले जात आहे. भुसावळ तालुक्यातील मौजे हातनूर व सावतर या दोन गावाचा दिड किलोमीटर अंतराचा शिवरस्ता सुमारे 20 ते 25 वर्षापासून बंद होता. शिवरस्ता बंद असल्याने शेतकर्यांना अडचणीच्या रस्त्यातून शेत-शिवारात जावे लागत होते शिवाय मोठे ट्रक वा ट्रॅक्टर शेतापर्यंत नेण्यास अडचण होत असल्याने शेतकर्यांना मोठा मनस्ताप सोसावा लागत होता.
तहसीलदार निता लबडे यांनी सर्व शेतकर्यांच्या उपस्थितीत शिवरस्त्याच्या बांधावरच बैठक घेत अडचणी जाणल्या. शिव रस्ता खुला झाल्यास सुमारे 300 शेतकर्यांची सोय होणार असल्याचे यावेळी संबंधित शेतकर्याला पटवून देत रस्त्यावरील अतिक्रमण काढून शिवरस्ता मोकळा करून देण्यात आला. यावेळी प्रतिष्ठित नागरिक, संबंधित गावातील सरपंच, वरणगाव मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल यांची उपस्थिती होती.
शेतकर्यांना दिले प्रशिक्षण
पमहसूल पंधरवडानिमित्त शुक्रवार, 9 ऑगस्ट रोजी नवनियुक्त तलाठी यांच्याकरिता एकदिवसीय सेवांतर्गत प्रशिक्षण उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार निता लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. महसूल प्रशासनाची तोंड ओळख महसूल कायदेविषयक बाबी, ई फेरफार प्रणाली, ई चावडी, ई पीक पाहणी, विविध प्रकारचे पंचनामे जबाब चौकशी, तलाठी यांच्या कर्तव्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. नायब तहसीलदार अंगत असटकर, प्रीती लुटे, मंडळाधिकारी एफ.एस.खान, तलाठी महादेव दाणे, मिलिंद तायडे, अव्वल कारकून शंकर ढवळे, अमोल पाटील यांनी सर्व महसूल विषयक बाबींवर प्रशिक्षण दिले.