एरंडोलनजीक भीषण अपघात : चाळीसगावचे दाम्पत्य ठार
अंत्ययात्रेहून परतताना भरधाव ट्रकने दुचाकीला उडवल्याने अपघात
Fatal accident near Erandol : Chalisgaon couple killed एरंडोल (17 ऑगस्ट 2024) : नातेवाईकांच्या अंत्यविधीतून चाळीसगावकडे निघालेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला भरधाव ट्रकने चिरडल्याने झालेल्या भीषण अपघातात चाळीसगावातील दाम्पत्य जागीच ठार झाले. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील न्यू इंग्लिश मेडियम स्कूलजवळ झाला. अविनाश विजयसिंग पाटील (55) व मीनाबाई अविनाश पाटील (48) असे मयत दाम्पत्याचे नाव आहे. अविनाश पाटील हे शिक्षक असल्याचे सांगण्यात आले.
परतीच्या प्रवासात घाला
पाटील दाम्पत्य पिंपळकोठा (ता.एरंडोल) येथे नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी दुचाकी (एम.एच.19 ईई 4717 ने) आले होते. अंत्यविधी झाल्यानंतर अविनाश पाटील हे पत्नीसह चाळीसगाव येथे जात असतांना सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास न्यू इंग्लिश स्कूल जवळ समोरून येणा-या सायकलस्वारास वाचवण्याचा प्रयत्न करीत असतांना अचानक जळगावकडून धुळ्याकडे जात असलेल्या ट्रक (क्रमांक एम एच 18 बीजी 1066) ने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्यामुळे अविनाश पाटील यांचेसह त्यांच्या पत्नी जागीच ठार झाल्या.

कुटूंब शोकसागरात
केवळ अर्ध्या तासापूर्वी सर्व नातेवाईकांना भेटून घराकडे जात असलेल्या अविनाश पाटील यांचा पत्नीसह अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळताच परिवारातील सदस्यांना मोठा धक्का बसून सर्व कुटुंब शोकसागरात बुडाले. मयत अविनाश पाटील हे निमगाव (ता.यावल) येथील मूळ रहिवासी असून नोकरीनिमित्त ते चाळीसगावी वास्तव्यास होते. येथे राहत होत्या.त्यांच्या पत्नी मीनाबाई पाटील ह्या चाळीसगाव येथे पाळणाघर चालवत होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत.
अपघातानंतर पोलिसांची धाव
अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्यासह एरंडोल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अविनाश पाटील व त्यांच्या पत्नी मीनाबाई पाटील यांना ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरद बागल व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत.
