भुसावळ तालुक्यातील भाविकांची बस नेपाळच्या मर्स्यांगडी नदीत कोसळली : मृतांचा आकडा पोहोचला 27 वर

मयत भुसावळ तालुक्यातील वरणगाव-तळवेल भागातील रहिवासी : 16 प्रवासी गंभीर


भुसावळ (24 ऑगस्ट 2024) : नेपाळ दर्शनासाठी निघालेल्या वरणगावसह-तळवेल परिसरातील पर्यटकांची बस युपीच्या नेपाळच्या तनहून जिल्ह्यातील मर्स्यांगडी नदीत कोसळल्याने 27 पर्यटकांचा मृत्यू ओढवला तर या अपघातात 16 प्रवासी गंभीर जखमी असून एक जण नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची भीती आहे. शुक्रवार, 23 ऑगस्ट सकाळी 11.30 वाजता हा अपघात मर्स्यांगडी अंबुखैरेनीजवळ घडला. भाविक पोखराहून काठमांडूला जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस 500 फुटावरून मर्स्यांगडी नदीत कोसळली. स्थानिक पोलीस आणि बचाव पथकानी मृतांसह जखमींना नदीपात्रातून बाहेर काढले.

भाजपाच्या माजी तालुकाध्यंक्षासह 26 जणांचा मृत्यू
नेपाळमधील भीषण बस अपघातात 26 जणांचा मृत्यू ओढवला आहे. सह वर्षीय बालिकेसह 14 महिला व 11 पुरूषांचा समावेश आहे. मृतांमध्ये वरणगावचे भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष सुधाकर बळीराम जावळे (56) यांच्यासह त्यांच्या पत्नी रोहिणी सुधाकर जावळे (51), सुहास प्रभाकर राणे (45), सरला सुहास राणे (42), चंदना सुहास राणे (19), मंगला विलास राणे (45), नीलिमा सुनील धांडे (57), तुळशिराम बुधो तायडे (62), सरला तुळशिराम तायडे (60), सागर कडू जावळे (32), विजया कडू जावळे (60), भारती प्रकाश जावळे (60), निलिमा चंद्रकांत जावळे (46), संदीप राजाराम सरोदे (50), पल्लवी संदीप सरोदे (43), गणेश पांडुरंग भारंबे (40), सुलभा पांडुरंग भारंबे (60), मीनल गणेश भारंबे, परी गणेश भारंबे (6), पंकज भगवान भंगाळे, अनिता अविनाश पाटील (44), अनुप हेमराज सरोदे (25), सरोज मनोज भिरूड (54), चालक मुर्तूजा खान व क्लिनर रामजीत मुन्ना (दोन्ही रा.गोरखपूर, उत्तरप्रदेश), रुपाली हेमराज सरोदे (50), गोकर्णी संदीप सरोदे (23) आदींचा समावेश आहे.

एकाही घरात पेटल्या नाहीत चुली
नेपाळ बस अपघातात मृत पावलेले भाविक पर्यटक हे सर्वसामान्य कुटूंबातील होते. देशदर्शनासह पर्यटनासाठी निघालेल्या भाविकांवर कोसळलेल्या संकटामुळे वरणगावसह तळवेल भागात शुक्रवारी सायंकाळी एकाही घरात चुली पेटल्या नाहीत तर सर्वदूर शोककळा पसरल्याचे चित्र होते. सुदैवाने अपघातात बचावलेल्या पर्यटकांच्या डोळ्यातून सकाळीच गाठभेट घेतलेल्या सहकार्‍याचा दुर्दैवी झालेला मृत्यू पाहून त्यांच्या डोळ्यातून दिवसभरात अश्रूंच्या धारा वाहतच होत्या.

भाविकांच्या बसला अपघात
भुसावळ तालुक्यातील वरणगावसह तळवेल परिसरातील भाविक नेपाळ दर्शनासाठी 15 ऑगस्ट रोजी रवाना झाले होते. पर्यटक प्रयागराजपर्यंत ट्रेनने गेल्यानंतर तेथून त्यांनी गोरखपूरच्या केसरवाणी टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स एजन्सीच्या तीन बसेस गोरखपूर ते नेपाळदरम्यान बुक केल्या होत्या. प्रवाशांना अलाहाबाद येथून पिक केल्यानंतर सुरूवातीला चित्रकूट, नंतर अयोध्या नेण्यात आले. मंदिर दर्शनानंतर गोरखपूरहून सुनौली लुंबिनी व तेथून पोखरा येथे भाविक गेले व त्यानंतर तीनही बसेस रांगेत काठमांडूच्या दिशेने येत असताना शुक्रवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास 43 पर्यटक घेवून निघालेली बस (क्रमांक यु.पी.53 एफ.टी.7623) ही चालकाचे नियंत्रण सुटल्याने उंच पहाडावरून नदीत कोसळली. या अपघातात बसचा चालक मूर्तिजा खान आणि वाहक रामजीतसह 27 पर्यटकांचा मृत्यू झाला. बस जिथे कोसळली ते ठिकाण डोंगराच्या खाली असल्याने बचावकार्यात अडचणी आल्या. गोरखपूर येथील विष्णू केसरवानी यांच्या मालकिच्या बसेस असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यातील तिघा मंत्र्यांनी जाणली माहिती
पुनर्वसन विभागाचे अधिकारी हे जळगाव जिल्हाधिकारी, उत्तर प्रदेश मदत आयुक्त (रिलीफ कमिश्नर) यांच्या संपर्कात असल्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली तर मंत्री गिरीश महाजन, मंत्री रक्षा खडसे यांनीदेखील माहिती जाणून घेत युपी प्रशासनाशी संवाद साधला.

कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न
अपघातग्रस्त बसमधील 27 प्रवाशांचा मृत्यू झाला तर त्यातील 10 गंभीर प्रवाशांना एअरलिप्ट करून काठमांडू हलवण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे तसेच अन्य प्रवाशांना वाचवण्यात यश आले मात्र काही प्रवासी नदीच्या प्रवाहात वाहिल्याची भीती आहे. नेपाळ दूतावासातील अधिकार्‍यांशी संपर्क साधला जात असून पर्यटकांची माहिती मिळाल्यानंतर मृतांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला जाईल, असे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले. नदीत बस पडल्याने बचावकार्य आव्हानात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले.

घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ
या घटनेचा व्हिडिओचा समोर आला आहे. व्हिडिओमध्ये बसचा अक्षरशः चक्काचूर झाला असून बस कोसळली त्यावेळी नदीतील पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याचं पाहायला मिळतं.

आमदारांच्या संपर्क कार्यालयात गर्दी
भुसावळचे आमदार संजय सावकारे यांना कार्यकर्त्यांनी घटना कळवल्यानंतर भुसावळ ग्रामीणमधील कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. आमदारांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी संपर्क साधून अपघाताची माहिती त्यांना कळवली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्री खडसे, आमदार सावकारे नेपाळला रवाना
मंत्री रक्षा खडसे यांच्यासह भुसावळचे आमदार संजय सावकारे, भाजपा पूर्व जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, सरचिटणीस परीक्षीत बर्‍हाटे, मुरलीधर पाटील, अतुल झांबरे, केदार ओक आदी शुक्रवारी दुपारी नेपाळकडे रवाना झाले. पदाधिकारी आधी ट्रेनने मुंबई व तेथून दिल्ली व नंतर काठमांडूला शनिवारी सकाळपर्यंत पोहोचतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

 

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !