बाप्पा आले घरा, तोरण सजले दारा !

भुसावळ शहरासह विभागात 258 मंडळांनी केली श्रींची स्थापना


भुसावळ : चौदा विद्या व चौसष्ट कलांचा अधिपती विघ्नहर्त्या गणरायाची भुसावळ शहरासह विभागात अतिशय जल्लोषात स्थापना करण्यात आली. भुसावळ शहरात 176 तर ग्रामीण भागात 82 अश्या 258 गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी श्रींची स्थापना केली. ढोल-ताश्याच्या गजरात गणरायाच्या आगमनाची मिरवणूक काढली होती. शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर साहित्य खरेदीला, मूर्ती खरेदीचा उत्साह दिसून आला.

भुसावळ विभागात 258 मंडळांकडून श्रींची स्थापना
भुसावळ शहरासह ग्रामीण भागात शनिवारी गणरायाचे आगमन धुमधडाक्यात झाले. शहरातील बाजारपेठ व शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तसेच ग्रामीण भागात गणपतीची विधीवत स्थापना करण्यात आली. शहरात 176 मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी श्रींची स्थापना केली तर ग्रामीण भागात 82 गणेश मंडळांनी गणपती बसविले. सुमारे सात हजार भाविकांनी मातीच्या मूर्तीची स्थापना केली. शहरातील जामने रोडवरील अष्टभुजा गणेश मंडळाची स्थापना उर्वेश नितीन धांडे यांच्याहस्ते करण्यात आली.

दोन गावांमध्ये एक गाव एक गणपती
पोलिसांनी ‘एक गाव एक गणपती’ बसविण्यासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यातील सुनसगाव व भिलमळी येथील रहिवाशांनी एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली. सुनसगाव तसेच भिलमळीत सातव्या वर्षी एकच गणपती बसविण्यात आला. उत्कृष्ठ आरास, वेळेत विसर्जन, समाज प्रबोधनात्मक देखावा यासाठी तालुका पोलीस ठाण्यातर्फे यंदा तीन बक्षिसे दिली जाणार आहे. यात तीन हजार, दोन हजार व एक हजार, शिल्ड, प्रमाणपत्र असे स्वरूप असेल, असे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांनी सांगितले.

पोलिसांनी दिल्या मंडळांना भेटी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर डीवायएसपी कृष्णात पिंगळेसह पोलिस अधिकारी राहूल वाघ, निरीक्षक उध्दव डमाळे यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात मंडळांना भेटी देत सुरक्षेच्या दृष्टीने सूचना केल्यात. मंडळाजवळ सीसीटिव्ही कॅमेरे लावावे, स्वयंसेवक नियुक्त करावे, असे सांगितले.

दररोज निर्माल्य संकलन
शहरातील सर्वच गणपती मंडळाजवळ निघणारे निर्माल्य संकलनासाठी गणपती स्थापनेच्या तिसर्‍या दिवसापासून दररोज निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र घंटागाडी फिरणार आहे. त्यात मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी त्याच्याकडील निर्माल्य टाकावे, रस्त्यात कुठेही टाकू नये, असे आवाहन माजी नगरसेवक निर्मल कोठारी यांनी केले आहे.

जय गणेश फाऊंडेशनच्या नवसाच्या गणपतीची मोठ्या उत्साहात स्थापना
भुसावळ :
जय गणेश फाऊंडेशनच्या नवसाच्या गणपतीची पारंपरिक वाद्यांच्या गजरात आगमन मिरवणूक निघून स्थापना करण्यात आली. रामदास ढाके आणि राजेंद्र यावलकर यांनी सपत्नीक सुरभी नगरच्या गणपती मंदिरापासून गुरव वाद्यांच्या गजरात गणपती बाप्पांना मंडपात आणले. त्यानंतर फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र यावलकर सपत्नीक आणि प्रा.मधुकर खराटे यांच्याहस्ते विधीवत पूजा करून गणरायाची स्थापना करण्यात आली. प्रसंगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उमेश नेमाडे, समन्वयक गणेश फेगडे, सचिव तुकाराम आटाळे, राहुल भावसेकर, तुषार झांबरे, हर्षल वानखेडे, नचिकेत यावलकर, प्रवीण पाटील, निलेश कोलते, जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांसह परिसरातील भाविक उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !