भुसावळातील संशयीताला गावठी पिस्टल व काडतूस विक्री करताना बेड्या

रावेर-पाल रस्त्यावर कारवाई : शस्त्र तस्करी पुन्हा आली ऐरणीवर


रावेर (26 सप्टेंबर 2024) : भुसावळ तरुणाला गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूस विक्री करताना रावेर पोलिसांनी रावेर-पाल रस्त्यावर सापळा रचून पकडले. संशयीताकडील गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे असा 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अब्दुल अनिस अब्दुल मज्जीद (बडी खानका, मुस्लीम कॉलनी, खडका रोड, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
रावेरचे पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांना गावठी पिस्टल विक्रीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे निर्देश दिले. गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील, पोलीस कर्मचारी विष्णू बिर्‍हाले, विनोद पाटील, ईश्वर देशमुख, राहुल महाजन, रवींद्र वंजारी, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, महेश मोगरे आदींच्या पथकाने संशयीताला रावेर-पाल रस्त्यावरील कुसुंबा ते लालमाती दरम्यान असलेल्या जल्लालशहा बाबांच्या दर्ग्यासमोरून अटक केली.

आरोपीच्या ताब्यातून गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आल्यानंतर आरोपी अब्दुल अनिस अब्दुल मज्जीद विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक तुषार पाटील करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !