पैशांसाठी मृतदेह अडवल्याचा आरोप निराधार ! : भुसावळातील पत्रकार परिषदेत डॉ.राजेश मानवतकर


Allegation of blocking the body for money is baseless ! : Dr.Rajesh Manavatkar in a press conference in Bhusawal भुसावळ (03 ऑक्टोबर 2024) : शहरातील पंचशील नगरातील रुग्ण आजाराने दगावला व त्याच्या नातेवाईकांकडून रुग्णालय प्रशासन वा मी पैसे मागितले नाहीत मात्र आमदारांनी स्थानिक प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना पैशांसाठी मृतदेह अडवण्यात आल्याचा केलेला आरोप वेदनादायी असल्याचे भुसावळातील हृदयरोग तज्ज्ञ डॉ.राजेश मानवतकर गुरुवारी रुग्णालयात आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले.

प्रत्यक्षात चर्चा केलीच नाही
डॉ.मानवतकर म्हणाले की, पंचशील नगरातील दिनेश चांदणे (32) या रुग्णाला कावीळ झाला होता शिवाय त्याचा बीपी शून्य होवून किडन्या फेल झाल्या होत्या. रुग्ण वाचणार नाही याची स्पष्ट कल्पना संबंधिताना 1 ऑक्टोबर रोजी रुग्ण दाखल करताना दिली होती व 2 रोजी सकाळी आठ वाजता रुग्ण दगावला मात्र नातेवाईकांनी घरची अडचण सांगून काही तासांनी मृतदेह नेणार असल्याचे सांगितले. रुग्णालय वा मी संबंधितांना बिलाची विचारणा केली नाही. सकाळी 10.45 वाजता आमदार आले व त्यांनी आपल्याशी चर्चा केली नाही मात्र मयताच्या नातेवाईकांना पैसे देत माध्यमाशी बोलताना हॉस्पीटलकडून बिलासाठी अडवणूक केली जात असल्याचा आरोप केला. हा प्रकार रुग्णालयाची प्रतिष्ठा समाज माणसातून कमी करणारा आहे मात्र आपण राजकारणात येत असलोतरी आयुष्यभर डॉक्टरच राहणार आहोत. जाणून-बुजून आपल्याला बदनाम करण्यात येत असून कदाचित राजकारणात पाऊल ठेवत असल्याने त्यांनी घेतलेला हा धसका असावा ! असे ते म्हणाले.

टार्गेट करण्याची बाब दुर्दैवी : प्रा.जतीन मेढे
15 वर्षात शहराच्या रस्त्यासह पाण्याची समस्या सुटलेल्या नाहीत. आम्ही 42 गावांचे आतापर्यंत दौरे केल्याने त्यात प्रचंड नाराजी दिसून आली आहे. आम्ही राजकीय दबावापुढे यापुढेही झुकणार नाही. अजय पाटील, मोहन निकम, लीना तल्लारे यांची उपस्थिती होती.

आमदार म्हणाले ; मयताच्या भावाने फोनद्वारे दिली कल्पना
आमदार संजय सावकारे म्हणाले की, मयताच्या भावाने आपल्या कार्यालयात येवून डॉक्टर पैशांसाठी मृतदेह देत नसल्याची माहिती दिली होती व वारंवार त्यासंदर्भात कॉलही केले असल्याने आपण तेथे जात आर्थिक मदत केली. आपल्याकडे त्याबाबतचे सर्व फुटेज असून त्याबाबत आपण माध्यमांना माहिती देवू, असेही त्यांनी सांगत डॉक्टरांनी निवडणुकीत खुशाल उभे रहावे, आपल्या त्यांना शुभेच्छा आहेत. यापूर्वी डॉक्टरांच्या सौभाग्यवतीदेखील आपल्या विरोधात निवडणूक रिंगणात उभ्या होत्या, असेही ते म्हणाले.


कॉपी करू नका.