भुसावळातील गांधी पुतळा-तापीनगर रस्त्याचे कारपेटचे काम सुरू
दीर्घ प्रतीक्षेनंतर वाहनधारकांना मिळाला दिलासा
भुसावळ (26 ऑक्टोबर 2024) : शहरातील गांधी पुतळा ते तापी नगरपर्यंतच्या रस्त्याचे खडीकरण करण्यात आले मात्र त्यावरील कारपेटचे काम राहिल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला मात्र गुरुवारपासून या रस्त्यावर कारपेटचे काम सुरू करण्यात आले आहे. गत महिन्यापासून रस्ता खडीकरणाचे काम करण्यात आले मात्र कारपेटचे काम झाले नसल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अनेक वाहनधारकांची वाहने पंक्चर होत असल्याने वाहनधारकांमधून कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
रस्त्याच्या कामामुळे वाहतूक विस्कळीत
या मार्गावरून वाहन चालवितांना खडीमुळे मोठ्या प्रमाणावर आवाज येत होता त्यातच दिवाळीचे दिवस असल्याने या रस्त्याने येणार्या जाणार्यांची संख्या वाढली आहे मात्र रस्त्यावर कारपेट नसल्याने वाहनधारक तीव्र संताप व्यक्त करीत होते. गुरुवारपासून प्रशासनाकडून या रस्त्यावर कारपेटचे काम सुरू करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी 10 वाजेपासून ठेकेदारांनी रस्त्याचे काम सुरू केले. रस्त्याच्या सुरू झालेल्या कामामुळे या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली तर एकाच बाजूने दोन्ही बाजूची वाहने ये-जा करीत असल्याने वाहतूक विस्कळीत झाली. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी वाहतुकीची वाहने, मोटर सायकली, विद्यार्थी सायकल यामुळे या रस्त्यावर वाहतूक जाम झाली तर रस्त्यावरच अतिक्रमण केलेले खाद्य पदार्थ विक्रेते ठाण मांडून असल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला.

