ग्रामदैवत प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने विजयश्री मिळण्याचा विश्वास ; जयश्री महाजन यांचा प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद


जळगाव (8 नोव्हेंबर 2024) : शहराचे ग्रामदैवत प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊन शुक्रवारी प्रभाग क्रमांक 17 मधील प्रचार दौरा महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांनी सकाळच्या सत्रात पूर्ण केला. आजच्या प्रचार रॅलीची सुरुवात जुन्या जळगावातील तरुण कुढापा चौकातून करण्यात आली. मोठ्या उत्साहात निघालेल्या या रॅलीत महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचा मोठ्या संख्येने सक्रिय सहभाग होता.

प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने विजयी होणार
तेली चौक मार्गे प्रचार रॅली जळगावचे ग्रामदैवत प्रभू श्रीराम मंदिरापर्यंत पोहचली. महाविकास आघाडीच्या विधानसभा उमेदवार जयश्री महाजन आणि त्यांचे पती सुनील महाजन यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. निवडणुकीतील आपल्या विजयासाठी प्रभू श्रीरामाला साकडे घातले. यावेळी बोलतांना, जयश्री महाजन यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असून, ग्रामदैवताच्या आशीर्वादाने विजयश्री खेचून आणू. कारण माझी उमेदवारी ही जळगावकरांसाठीच असून, माझा विजय म्हणजे त्यांचाच विजय आहे, असा आत्मविश्वास व्यक्त केला.

त्यानंतर प्रचार रॅली आंबेडकर नगरमध्ये आल्यावर जयश्री महाजन यांनी बुद्ध विहारात जाऊन तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले. या ठिकाणी नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी स्थानिकांच्या समस्या जाणून घेत, त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या समस्यावर लवकरच निराकरण होण्याबद्दल आश्वस्थ केले.

यानंतर प्रचार रॅली खानदेशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ऐतिहासिक वाड्याजवळ पोहोचली. जयश्री महाजन आणि महाविकास आघाडीच्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खान्देशकन्या बहिणाबाई यांच्या प्रतिमेला अभिवादन करून या मातीला साहित्यिकदृष्ट्या समृध्द केल्याबद्दल त्यांचे कृतज्ञ स्मरण केले. आजच्या प्रचार रॅलीत महाविकास आघाडीचे स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कॉपी करू नका.