सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील मतदान केंद्रावर विधानसभा निरीक्षकांची भेट
यावल तालुक्यातील अतिदुर्गम भागात दहा किलोमीटर पायी प्रवास करून गाठले मतदान केंद्र
यावल (11 नोव्हेंबर 2024) : विधानसभा निवडणुकीत पारदर्शक प्रकियेसह प्रत्येक नागरिकाला मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाकडून काळजी घेतली जात आहे. या अनुषंगानेच रावेर व चोपडा विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक अरुण कुमार यांनी यावल तालुक्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात असलेल्या आंबापाणी मतदान केंद्राची स्वत: जाऊन पाहणी केली. अतिदुर्गम भागात सातपुड्याच्या वनराईतून दहा किलोमीटर पायी चालून त्यांनी सदर मतदान केंद्र गाठले आणि तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. या मतदान केंद्रावर तब्बल 384 मतदार आहेत. यावल तालुक्यात अतिदुर्गम भागात एकूण सात मतदान केंद्र आहेत.
अतिदुर्गम भागातील केंद्राला भेट
विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक नागरिकाला आपल्या मतदानाचा हक्क बजावता आला पाहिजे. या दृष्टिकोनातून निवडणूक आयोग व्यवस्था करीत आहे. याच अनुषंगाने सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात यावल तालुक्यात असलेल्या सात मतदान केंद्रावर व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी रावेर विधानसभा मतदारसंघ आणि चोपडा विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक अरुण कुमार हे आले होते. मंगळवारी त्यांनी सातपुड्याच्या वनराईत यावल तालुक्यात येणार्या अतिदुर्गम भागातील आंबापाणी येथील मतदान केंद्र क्रमांक 22 ला भेट देत व्यवस्थेचा आढावा घेतला. या मतदान केंद्रावर एकूण 384 मतदार आहेत. या अतिदुर्गम भागात तब्बल दहा किलोमीटर पायी प्रवास करून त्यांनी मतदान केंद्र गाठले. त्यांच्यासोबत तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांची देखील उपस्थिती होती.

सोलर पॅनलद्वारे वीजपुरवठा
या मतदान केंद्रावर विद्युत पुरवठा नसल्याने सोलर पॅनलची व्यवस्था केली आहे. तसेच इन्व्हर्टरच्या माध्यमातून या ठिकाणी मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. नेटवर्क शॅडो एरियामधील हे मतदान केंद्र असल्यामुळे या ठिकाणी दर दोन तासाच्या मतदानाची माहिती देण्यासाठी रनर नियुक्त करण्यात आले आहेत.
हरीपुरा येथून दहा किमीचा पायी प्रवास
सातपुड्याच्या अतिदुर्ग भागात आंबा पाणी हा आदिवासी पाडा आहे. चोपडा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक 22 येथे आहे. व या मतदान केंद्रावर 384 मतदार आहेत. या गावाला जाण्यासाठी यावल तालुक्यातील हरिपुरा येथे जावे लागते व तेथून सातपुड्याच्या वनराईत दहा किलोमीटर पायी प्रवास केल्यानंतर या केंद्रापर्यंत पोहोचता येते. तेव्हा निरीक्षक पायी या केंद्रापर्यंत पोहोचले होते.
अतिदुर्गम भागातील सात मतदान केंद्र
यावल तालुक्यात अतिदुर्गम भागात नेटवर्क शॅडो असलेले सात मतदान केंद्र आहे. यातील आंबापाणी, गाड्र्या, जामन्या, उसमळी, लंगडा आंबा व रुईखेडा हे सहा मतदान केंद्र चोपडा विधानसभा मतदारसंघात येतात तर रावेर विधानसभा मतदारसंघात यावल तालुक्यातील चारमळी हे अतिदुर्गम भागातील मतदान केंद्र आहे.
दहा दुचाकींची व्यवस्था
अतिदुर्गम भागातील या सात मतदान केंद्रावर साहित्य पोहोचवणे, कर्मचारी पोहोचवणे यासाठी प्रशासनाकडून दहा दुचाकींची व्यवस्था करण्यात आली आहे. या सात पैकी सहा केंद्राच्या पाचशे मीटर अंतरावर नेटवर्क उपलब्ध असते. मात्र, आंबापाणी येथे दहा किलोमीटर अंतर पार केल्यानंतरच नेटवर्क मिळते म्हणून येथे रनर ठेवण्यात आल्याची माहिती तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी दिली.
