यावल आगाराच्या तीन बसेसच्या काचा फोडल्या

सेवा समाप्तीच्या नोटीसीनंतर काही कर्मचारी कामावर : मनसे पदाधिकार्‍यांना घेतले ताब्यात


यावल : तब्बल 18 दिवसांपासून एस.टी.कर्मचार्‍यांचा संप कायम असताना सेवा समाप्तीची अंतिम नोटीस बजावण्यात आल्यानंतर काही कर्मचारी कामावर रूजू झाले. शुक्रवादी दुपारी तीन बसेस जळगाव मार्गावर रवाना झाल्या खर्‍या मात्र यावल-चोपडा रस्त्यावरील वढोदा येथे अज्ञातांनी बसेसवर दगडफेक केल्याने चालकांनी जागेवरच बसेस थांबवल्या. यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात आले. या प्रकरणी दगडफेक करणार्‍यांविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अज्ञातांनी तीनही बसेसच्या दर्शनी व मागील बाजूवर दगड भिरकावल्याने काचा फुटल्या आहेत. दरम्यान, यावल आगाराला एस.टी.सेवेला या प्रकारानंतर पुन्हा ब्रेक लागला आहे.

मनसे पदाधिकार्‍यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
शुक्रवारी यावल एसटी आगारात 13 कर्मचार्‍यांना थेट सेवा समाप्तीची नोटीस बजावण्यात आल्याने हे कर्मचारी कसेतरे कामावर रूजू झाले. यावेळी कामावर परतलेल्या कर्मचार्‍यांना इतर संपकरी कर्मचार्‍यांना विनंती केली आणि त्यावरून बराच वाद चालला तर या कर्मचार्‍यांच्या मदतीने शुक्रवारी दुपारी 4.15 वाजेला बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आगारात धडकले व त्यांनी संपात फुट पडू देवू नका म्हणून कामावर परतलेल्या कर्मचार्‍यांना विनंती केली मात्र, आगारात हस्तक्षेप करणार्‍या मनसेच्या जनहित जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर, जिल्हाध्यक्ष कमलाकर घारू, जुगल पाटील, आकाश चोपडे, सुमित घारू, किशोर नन्नवरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व आगारात पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरणार, उपनिरीक्षक विनोद खांडबहालेसह कर्मचार्‍यांनी बंदोबस्त ठेवला.

अज्ञातांनी फोडल्या बसेस
यावल-विदगावमार्गे जळगावसाठी यावल आगारातून तीन बसेस रवाना करण्यात आल्या मात्र या तीन्ही बसेसवर यावल-चोपडा रस्त्यावरील वढोदा येथे अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करीत बसेसच्या काचा फोडण्यात आल्याने चालकांमध्ये भीती पसरली व त्यांनी जागेवरच बसेस उभ्या करीत आगार व्यवस्थापक एस.व्ही.भालेराव यांना माहिती दिल. घटनास्थळी प्रभारी पोलीस निरीक्षक कैलास नागरे, उपनिरिक्षक जितेंद्र खैरणार, भुषण चव्हाण, सुशील घुगेसह पथकाने भेट दिली व पंचनामा करून बस आगारात नेण्यात आल्या. दरम्यान, यावल पोलिसात एस.टी.चालक मधुकर धनसिंग संकपाळ (53, रा.बोरावल, ता.यावल) यांच्या फिर्यादीनुसार अज्ञाताविरोधात एस.टी.बसेसवर दगडफेक करून नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. एस.टी. बस क्रमांक (एम.एच.20 बी.एल.0520, एम.एच.20 बी.एल.0931 व एम.एच.20 बी.एल.3471) या बसेसचा अनुक्रमे दर्शनी व अन्य दोघा बसेसचा पाठीमागील काच फोडण्यात आला आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !