विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्याने यावल गटशिक्षण अधिकारी सन्मानीत
यावल (6 डिसेंबर 2024) : यावल तालुक्यातील रावेर विधानसभा मतदार संघात शिक्षण विभागाच्या वतीने विधानसभा निवडणूक पुर्व जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात आले व याचे फलित विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्याने फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयात गटशिक्षण अधिकारी यांना सन्मानीत करण्यात आले.
गटशिक्षणाधिकार्यांचा सन्मान
रावेर यावल विधानसभा मतदान क्षेत्रात विधानसभा मतदानाच्या वेळी मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी यावल तालुक्यातून लोकशाही शासनव्यवस्था म्हणजे काय, मतदानाच्या हक्काचे महत्व काय आहे, मतदाराला लोकशाही शासनव्यवस्थेत किती महत्व आहे, मतदार राजा असतो त्याच्या मताने निवडून आलेले लोकप्रतिनिधी राज्य कसे चालवतात इत्यादी बाबत मतदान जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आले. शिक्षण विभागाकडून यावल तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बीआरसी कार्यालयातील कर्मचारी, शिक्षण आस्थापना स्टाफ यांनी गावागावात वाडी, वस्तीत प्रभाविपणे राबविल्याने मतदानाची टक्केवारी वाढीस मदत झाली, त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत बबनराव काकडे, रावेर तहसीलदार बंडू कापसे यांनी यावलचे गटशिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके यांना फैजपूर कार्यालयात आयोजित कार्यक्रमात सन्मानपत्र देऊन सन्मानित केले व यावल शिक्षण विभागाचा गौरव केला. गटशिक्षण अधिकारी यांच्या झालेल्या गौरवाबद्दल त्यांचे सर्व अभिनंदन होत आहे.


