नीलम गोर्हे पक्षातून जाताना घाण करून गेल्या : खासदार संजय राऊत
न्यूज नेटवर्क । मुंबई (24 फेब्रुवारी 2025) : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांचे कालचे वक्तव्य ही विकृती असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार यांनीदेखील या वक्तव्याचा निषेध करायला हवा, असे राऊत म्हणाले.
आमदारकीसाठी उद्धव ठाकरेंना द्याव्या लागतात मर्सिडीझ
उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आमदारकी मिळवण्यासाठी दोन मर्सिडीझ द्याव्या लागतात, असे वक्तव्य विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनात आयोजित मुलाखती दरम्यान केले. या वक्तव्याचे आज राज्यभरात डसाद उमटले. खासदार संजय राऊत यांनी या वक्तव्यावरुन नीलम गोर्हे यांच्यावर चांगलीच आगपाखड केली. त्यांचे कालचे वक्तव्य ही विकृती असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.

नीलम गोर्हे पक्षातून जाताना घाण करून गेल्या, अशा शब्दात संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. पक्षात कोणती घाण आणली, असे बाळासाहेबांनी विचारले होते, अशा शब्दात राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली. ती अतिशय विश्वासघातकी बाई असल्याची टीकादेखील त्यांनी केली आहे. पुण्यात आणि नाशिकमध्ये उमेदवारी देताना नीलम गोर्हे यांनी किती पैसे घेतले? असा प्रश्न देखील राऊत यांनी उपस्थित केला.
कार्यक्रमासाठी उषा तांबे यांना 50 लाख रुपये दिले
मराठी साहित्य महामंडळाने नीलम गोर्हे यांच्या वक्तव्यावर माफी मागायला हवी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे. कार्यक्रम ठरवण्याचा अधिकार या साहित्य महामंडळाचा असतो. नीलम गोर्हे यांचा कार्यक्रम ठेवण्यासाठी उषा तांबे यांना 50 लाख रुपये दिले गेले. याची कबुली त्यांनी स्वतः पत्रकारांशी बोलताना दिली आहे. त्याचे सर्व रेकॉर्ड उपलब्ध असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. उषा तांबे या भ्रष्टाचारी असल्याचा आरोप करत त्यांचे साहित्यातील योगदान काय? असा प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला.
शरद पवार आणि तारा भवाळकर यांनीही माफी मागण्याची मागणी
नीलम गोर्हे यांच्या कालच्या वक्तव्याचा संमेलनाचे स्वागत अध्यक्ष म्हणून शरद पवार आणि डॉ. तारा भवाळकर यांनी देखील निषेध केला पाहिजे. ते गप्प कसे राहू शकतात? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. साहित्य संमेलनाच्या मंचावरून असे वक्तव्य करणार्या लोकांमुळेच मराठी साहित्य आणि मराठी भाषेचे नुकसान झाले आहे. अशावेळी शरद पवार आणि तारा भवाळकर यांनीही माफी मागण्याची मागणी राऊत यांनी केली आहे. दिल्लीत साहित्य संमेलन नाही तर केवळ राजकारण झाले असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. माझा आवाज शरद पवारांपर्यंत जाईल ,त्यावेळी ते देखील बोलतील, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.
