सावदावासीयांची करवाढीपासून सुटका : 54 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर
शहर विकासासाठी विविध तरतुदी : कर वाढ नसल्याचा दिलासा
सावदा (1 मार्च 2025) : सावदा नगरपालिकेने 2025-26 या वर्षांकरिता 54 कोटी 10 लाख 95 हजार 468 रुपयांचा व 17 लाख 46 हजार रुपये शिलकीचा व कोणतीही करवाढ नसलेला अर्थसंकल्प मुख्याधिकारी भूषण वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली लेखापाल विशाल पाटील, अंतर्गत लेखापरीक्षक भरती पाटील रोखपाल विमालेश जैन यांनी तयार केल्यानंतर त्यास प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी फैजपूर बबनराव काकडे यांनी गुरुवार, 28 रोजी मंजुरी दिली.
शहर विकासाच्या तरतुदी
या अर्थसंकल्पात शासकीय योजनांच्या माध्यमातून विविध विकास कामांवर भर देण्यात आला आहे. विशेष रस्ता योजनेत एक कोटी, वैशिष्टयपूर्ण योजने एक कोटी, हद्दवाढ योजनेत एक कोटी, अल्पसंख्यांक क्षेत्र विकास योजनेत 70 लक्ष, 15 वित्त आयोग एक कोटी, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पासाठी दोन कोटी, अमृत 2.0 योजनेसाठी 10 कोटी, रमाई आवास योजना 50 लाख, नको नगरोथान महाआभियान 50 लाख रुपये, प्रधानमंत्री आवास योजना 1 कोटी रुपये रस्ते विकास 70 लाख रुपये अश्या विविध तरतूदी शहरविकासाचे दृष्टीने यात सुचविण्यात आल्या आहेत. भांडवली खर्चावर अधिक भर देण्यात आला आहे. अर्थसंकल्पात कोणती अतिरिक्त करवाढ नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे तर विविध अनुदाने, योजना, नगरपालिका करे, व पालिका मालमत्ता यातील भाडे यातून निधीची तरदूत होईल, असे अपेक्षित करण्यात आले आहे.







