मुक्ताईनगरातील मुलींची छेडखानी करणार्यांची गय नाही : मुख्यमंत्री
मुंबई (2 फेब्रुवारी 2025) : मुक्ताईनगरातील कोथळी यात्रोत्सवात गेलेल्या मुलींची छेड काढण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी छेड काढणार्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा अशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दुर्दैवाने त्या घटनेत एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी आहेत ज्यांनी अतिशय वाईट प्रकारचं काम केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून काहींना अटकही झाली आहे. इतरांनाही अटक केली जाईल. सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे त्रास देणे, छेडछाड करणे हे अत्यंत चुकीचे आहे. कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना माफी देता कामा नये. त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.

मतदारसंघात गुंडगिरी वाढली : माजी मंत्री खडसे
घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. ज्यांनी छेडछाड केली ते टवाळखोर नाहीत तर गुंड आहेत. त्यांच्याविरोधात आधीसुद्धा गुन्हे दाखल आहेत. या मुली जेव्हा यात्रेत गेल्या होत्या तेव्हा त्यांच्यासोबत एक पोलीस होता, या पोलिसाने गुंडांना अडवण्याचा प्रयत्न केला परंतु त्या गुंडांनी पोलिसाला मारहाण आणि शिवीगाळ केली. मतदारसंघात गेल्या तीन ते चार वर्षात गुंडगिरी वाढली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीचं संरक्षण या गुंडांना आहे, असा दावा खडसेंनी यावेळी केला.
