महिलांना एक खून माफ करा : अॅड.रोहिणी खडसेंची राष्ट्रपतींकडे मागणी
मुंबई (9 मार्च 2025) : आम्ही महिला असल्याने एक खून माफ करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी तमाम महिलांच्या वतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे महिलादिनी केली. या मागणीनंतर अनेक मत-मतांतरे व्यक्त झाली तर त्यावर अॅड.खडसे यांनी अत्याचारी मानसिकता, बलात्कारी प्रवृत्ती आणि निष्क्रिय कायदा-सुव्यवस्थेचा खून करायचा आहे, असे स्पष्टीकरण दिले.
मुंबईत केले आंदोलन
रोहिणी यांनी मुंबईत मुख्यमंत्री फडणवीसांच्या सह्याद्री गेस्ट हाऊसमोर आंदोलनही केले. महिलादिनी त्यांनी केलेल्या या मागणीमुळे एकच खळबळ उडाली. मुख्यमंत्री फडणवीस आम्हा महिलांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी पाच मिनिटांचाही वेळ देत नसल्याने अशी मागणी करण्याचे पाऊल त्यांनी उचलले आहे.

जागतिक महिलादिनाचा मुहूर्त साधून रोहिणी खडसे यांनी समाज माध्यमांतून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावे एक पत्र जारी केले आहे आणि तीच मागणी करणारा एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. त्यात प्रारंभीच त्यांनी आपला देश महात्मा बुद्ध आणि महात्मा गांधीचा देश असून अहिंसेची शिकवण त्यांनी सार्या जगाला दिली आहे, हे नमूद केले आहे. असे असतानाही आपण एक खून माफ करण्याची मागणी करीत असल्याबद्दल क्षमाही मागितली आहे.
आशियात महिलांसाठी भारत सर्वात असुरक्षित
मुंबईत 12 वर्षीय बालिकेवरील सामूहिक अत्याचारामुळे व्यथित होऊन हे पत्र लिहीत असल्याचे म्हटले आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू सर्व्हेनुसार भारत आशिया खंडातील महिलांसाठी सर्वात असुरक्षित देश म्हणून गणला गेला आहे. म्हणूनच आम्हाला एक खून माफ करा, अशी विनंती मी सर्व महिलांच्या वतीने करीत आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.
महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी रोहिणी खडसे मुंबईत सह्याद्री गेस्ट हाऊसवर गेल्या होत्या पण मुख्यमंत्री फडणवीसांनी भेट नाकारली म्हणून त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. पोलिसांनी त्यांना अटक करून पोलिस ठाण्यात नेले. नंतर त्यांची सुटका केली. आमच्याशी चर्चा करण्याऐवजी महिलादिनी आम्हाला अटक करणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याची टीका खडसे यांनी केली.
