राज ठाकरेंचे गंगेच्या पाण्याबाबत वादग्रस्त विधान : म्हणाले, कोण पिणार ते पाणी !
मुंबई (9 मार्च 2025) : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गंगेतील दूषित पाण्याबद्दल भाष्य केल्यानंतर राज्यात मोठा राजकीय वाद पेटला आहे तर राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर विविध प्रतिक्रिया देखील उमटत आहेत. कोण पिणार ते पाणी? डोकी हलवा, जरा अंधश्रद्धेतून बाहेर या, अशा शब्दात राज ठाकरे यांनी गंगेच्या पाण्याबाबत वक्तव्य केल आहे.
दूषित पाण्यावरून सुनावले
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 19वा वर्धापन दिन रविवारी पार पडला. या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले. याचवेळी त्यांनी गंगेतील दूषित पाणी तीर्थ म्हणून प्राशन केलं गेलं, त्यावरूनही सुनावलं. राज ठाकरे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले, काल मला सांगिलं कुणीतरी. मुंबई बैठक लावली होती. काही शाखाध्यक्ष आणि पदाधिकारी हजर झाले नाहीत. मग जे हजर झाले नाहीत, त्यांची हजेरी घेतली. आणि मग प्रत्येकाला विचारलं. त्यातल्या पाच-सहा जणांनी सांगितलं, साहेब कुंभला गेलो होतो. म्हटलं गधड्यानो पापं कशाला करता? मी हेही विचारलं की, अंघोळ केलीस ना?
आमचे बाळा नांदगावकर कमंडलूमधून पाणी घेऊन आले. म्हटलं हड, मी नाही पिणार. आता तो सोशल मीडिया आलाय. पूर्वीच्या काळी ठिक होतं. मी त्या सोशल मीडियावर बघतोय माणसं, (अंघोळ करतानाची नक्कल करत) घासताहेत. आणि बाळा नांदगावकर साहेब, गंगेचं पाणी. अरे कोण पिणार ते पाणी?, असे राज ठाकरे म्हणाले.




आताच कोरोना गेलाय, कुणाला त्याचं देणं-घेणं नाही. दोन वर्ष तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन अंघोळ करताहेत. मी असे कित्येक स्वीमिंग पूल बघितले जे उद्घाटनाला निळे होते. हळूहळू हिरवे झाले. कोण जाऊन पडेल त्यात. त्या गंगेत? त्याने तिथे काही केलंय आणि मी इथे तीर्थ प्राशन करतोय, असं व्यंगात्मक भाष्य ठाकरेंनी केले.