भुसावळात रेकॉर्डवरील संशयीत मुकेश भालेरावची हत्या
आठ दिवसांनी खून उघडकीस : खुनानंतर मध्यरात्री उरकला दफनविधी
Murder of Mukesh Bhalerao, a suspect on record, in Bhusawal भुसावळ (21 मार्च 2025) : भुसावळातील पोलिसांच्या रेकॉर्डवरील संशयीत मुकेश भालेरावची हत्या करून मृतदेह दफन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय असून काही संशयीतांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.
पोलिसांच्या रेकार्डवरील संशयीत
मृत मुकेश प्रकाश भालेराव (32, टेक्नीकल हायस्कूलमागे, भुसावळ) विरोधात अनेक गुन्हे पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहे तर मध्यंतरी त्यास स्थानबद्धदेखील करण्यात आले शिवाय हद्दपारीची कारवाईदेखील त्याच्यावर करण्यात आली होती.

पूर्व वैमनस्यातून केली हत्या
सूत्रांच्या माहितीनुसार, पूर्व वैमनस्यातून ही हत्या करण्यात आली व खून उघडकीस न येण्यासाठी तापी नदीजवळील निर्जनस्थळी पुरण्यात आला. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.




