मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा 8 मे रोजी निकाल
Malegaon blast case verdict on May 8 मालेगाव (21 एप्रिल 2025) : सन 2008 मध्ये मालेगाव शहरातील एका मशिदीजवळ 29 सप्टेंबर 2008 रोजी मोटारसायकलमध्ये स्फोटके ठेवून बॉम्बस्फोट करण्यात आला होता. त्यात सहा जण ठार होवून शंभराहून अधिक जखमी झाले होते. यासंदर्भातील खटला विशेष एनआयए न्यायालयात सुरू होता. या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली असून 8 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.
शनिवारी सरकारी वकिलांनी न्या. ए. के. लाहोटी यांच्यासमोर लेखी युक्तिवाद दाखल केला. त्यानंतर न्यायालयाने खटल्याची सुनावणी पूर्ण केल्याचे जाहीर केले.

खटल्यादरम्यान 323 सरकारी वकिलांची साक्ष न्यायालयात नोंदविण्यात आली. त्यापैकी 34 साक्षीदार ‘फितूर’ झाले.
लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, भाजप नेत्या प्रज्ञासिंह ठाकूर, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहीरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांच्यावर यूएपीएअंतर्गत व आयपीसी अंतर्गत खटला भरविण्यात आला.
सुरुवातीला या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएस करत होती. त्यानंतर 2011 मध्ये हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात आले.
एनआयएकडे तपास आल्यानंतर 2016 मध्ये त्यांनी अतिरिक्त आरोपपत्र दाखल करत प्रज्ञासिंह ठाकूर, श्याम साहू, प्रवीण टाकळकी यांना पुराव्याअभावी क्लीन चिट दिली. त्यांना दोषमुक्त करण्याची शिफारस न्यायालयाला केली.
मात्र, एनआयए न्यायालयाने साहू, कलासांगरा, टाकळकी यांना निर्दोष सोडले मात्र ठाकूरला दोषमुक्त करण्यास नकार दिला. विशेष न्यायालयाने 30 ऑक्टोबर 2018 रोजी सात आरोपींविरुद्ध यूएपीए कायदा आणि आयपीसीअंतर्गत नव्याने आरोप निश्चित केले. त्यांच्यावरील मकोका हटविण्यात आला.
