अन् जोगलखोरीतील आदिवासी भिल्ल बांधवांचे चेहरे उजळले
जात प्रमाणपत्रासह शासकीय योजनांचा लाभ : भुसावळ तहसीलदारांचा उपक्रम
And the faces of the tribal Bhil brothers in Jogalkhori lit up. भुसावळ (29 एप्रिल 2025) : मजुरीसाठी भटकणे भाळी लिहिलेल्या भुसावळ तालुक्यातील जोगलखोरी या छोट्याशा गावातील अनेकांकडे जात प्रमाणपत्रासह आधारकार्ड तसेच दाखल्यांचा अभाव असल्याने त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येत नव्हता मात्र काही दिवसांपूर्वीच गाव भेट दौर्यावर आलेल्या भुसावळ तहसीलदार निता लबडे यांच्याशी ग्रामस्थांशी संवाद साधताना आपल्या अडचणी मांडल्या. त्यानंतर तहसीलदारांनी गावात प्रशासनाच्या लवाजम्यासह धाव घेतली. प्रत्यक्ष लाभार्थींशी संवाद साधत त्यांना शासकीय योजना व कागदपत्रांचे महत्व सांगितले. मिळेल त्या कागदपत्रांची जुळवा-जुळव करीत अधिकाराचा वापर करून गावातील सुमारे 37 वर महिलांना जात प्रमाणपत्र तर काहींना आधारकार्ड तर काहींना संजय गांधी विधवा पेन्शन योजनेचा लाभ देण्यात आला. अनेक वर्षांनंतरही केवळ कागदपत्रांच्या अभावामुळे शासकीय योजनांपासून वंचित ठरलेल्या आदिवासी भिल्ल समाजातील महिलांना लाभ मिळाल्यानंतर त्यांचे चेहरे आनंदाने उजळले व त्यांनी प्रशासनाला धन्यवाद दिले.
गाव भेटीत जाणवली समस्या
जोगलखोरी, ता.भुसावळ येथील भिल्ल समाजाच्या आदिवासी वृद्ध व विधवा महिलांकडे जात प्रमाणपत्रासह आधारकार्ड, इलेक्शन कार्ड नसल्याने त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येत नव्हता तर अनेक महिलांचा तर बालपणीच विवाह होवून त्या विधवाही झाल्या मात्र त्यांच्याकडे पतीचा मृत्यू दाखला नसल्याने त्यांना कागदपत्रे बनवण्याची अडचण येत होती. मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवस कामाच्या आढाव्या अंतर्गत तहसीलदारांनी गाव भेट दिल्यानंतर समस्या समजून घेतल्या.

स्थानिक चौकशीसह पंचनाम्याचा निकष
अनेकांकडे विविध कारणांनी जातीचा दाखला, वयाचा पुरावा, रहिवाशी पुरावे, मतदान कार्ड नसणे, आधार कार्ड नसणे अशा उणिवाही लक्षात आल्यानंतर विशेष बाब म्हणून जोगलखोरीतील भिल्ल विधवा महिलेला योजनेचा लाभ देण्यात आला. पंच मंडळी, स्थानिक चौकशी व पंचनामा करून मंडळ अधिकार्यांकडून अहवालासह प्रस्ताव तयार करण्याबाबत तत्काळ निर्देश देण्यात आले. जातीचे पुरावे नसल्यामुळे ज्या महिलांचे जातीचे दाखले काढले गेले नाही, अशा महिलांची मंडळ अधिकार्यांमार्फत घरी भेट घेणे, कुलदैवत, उत्सव, रुढी पंरपरा, विवाह समारंभ आदींबाबत स्थानिक चौकशी अहवालासह उपलब्ध असलेले रक्ताच्या नात्यातील पुरावे लक्षात घेऊन संबंधित प्रस्ताव उपविभागीय अधिकार्यांकडे पाठवून जातीचे दाखले मंजूर करण्यात आले.
अन् लाभार्थींचे उजळले चेहरे
जोगलखोरीतील सुमारे 40 वर भिल्ल समाजातील महिलांना जात प्रमाणपत्राचा गावी जावून लाभ देण्यात आला तर काहींची आधारकार्डाची अडचण दूर करण्यात आली तर काहींची इलेक्शन कार्डची समस्या सुटली तर विधवा महिलांना संजय गांधी विधवा पेन्शन योजनेचा लाभ देण्यात आल्याने लववकरच पेन्शन सुरू होणार आहे. गतिमान प्रशासनाच्या अनुभव घेतलेल्या व गावात मिळालेल्या दाखल्यांमुळे लाभार्थींचे चेहरे उजळले व त्यांनी तहसीलदारांनी मनापासून धन्यवाद दिले.
प्रशासकीय अधिकारी म्हणून मी धन्य झाले : तहसीलदार
मजुरीसाठी भटकणे भाळी लिहिलेल्या जोगलखोरीतील महिलांना कागदपत्रे किती महत्त्वाची ते कळण्याइतपतही जागरूकता नाही. प्रशासनाने स्वतःहून दखल घेत गावातील 37 वर वयोवृद्ध महिलांना जातप्रमाणपत्र तर अनेकांना आधार व इलेक्शन कार्ड उपलब्ध करून दिले तसेच शासकीय योजनेतून पेन्शन प्राप्त होण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून लवकरच त्याचाही लाभ लाभार्थींना मिळणार आहे. माय-माऊलींना मिळालेल्या लाभानंतर त्यांचे उजळलेले चेहरे पाहून इतका आनंद झाला की तो नुसता बघूनच प्रशासकीय अधिकारी म्हणून मी धन्य झाले, असे भुसावळ तहसीलदार नीता लबडे म्हणाल्या.
