बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू : दोन कुटूंबांना 50 लाखांचा धनादेश सुपूर्द
Death in leopard attack : Cheque of Rs 50 lakh handed over to two families यावल (29 एप्रिल 2025) : यावल तालुक्यातील साकळी शेत-शिवार त्याचप्रमाणे डांभूर्णी शेतशिवारात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये बालक व बालिका ठार झाली होती. या दोन्ही बालकांच्या कुटुंबीयांना यावल पंचायत समितीच्या सभागृहात सोमवारी आयोजित एका कार्यक्रमात वनविभागाच्या वतीने व शासनाच्या वतीने प्रत्येकी 25 लाख मिळून 50 लाखांचा धनादेश वितरीत करण्यात आला.
साकळी शेतशिवारात मानकीच्या जंगलात 6 मार्च रोजी सुनीता प्रेमा बारेला (रा.किनगाव बुद्रुक ,ता.यावल, मूळ रहिवासी खरगोन, मध्यप्रदेश) ही महिला सात वर्षीय मुलगा केशव बारेलासह घरी जात असतांना बिबटयाने हल्ला करीत बालकास ठार केले होते तर दुसरी घटना 16 एप्रिल रोजी डांभूर्णी शेत शिवारातील प्रभाकर श्रीकृष्ण चौधरी यांच्या शेत गट क्र. 741 मध्ये घडली होती. यात मेंढपाळ कुटुंबातील जिजाबाई सतिष ठेलारी यांच्या जवळ झोपलेल्या त्यांच्या दोन वर्षीय बालिका रत्नाबाई ठेलारी या चिमुकलीला बिबट्याने उचलून नेले व ठार केले होते.

बारेला व ठेलारी या दोन्ही कुटुंबास वनविभाग तथा शासनाकडून नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी 25 लाख रुपये मंजूर करण्यात आले. सोेमवारी यावल पंचायत समितीच्या सभागृहात दोन्ही कुटुंबास आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याहस्ते धनादेश वितरीण करण्यात आला. प्रसंगी बाजार समितीचे उपसभापती बबलु कोळी, संचालक सुर्यभान पाटील, भरत चौधरीसह वनविभागाचे सुनील भिलावे, स्वप्निल फटांगडे सह आदींची उपस्थिती होती.
