भुसावळात अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर 24 तासात ‘अतिक्रमण जैसे थे’
भुसावळ (9 जुलै 2025) : शहरातील वाढत्या अतिक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेने सोमवारी मोठी कारवाई करत अनेक हातगाड्या आणि दुकाने हटवली मात्र या कारवाईचा प्रभाव केवळ 24 तास टिकल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. पालिकेने हटवलेल्या त्याच ठिकाणी पुन्हा हातगाड्या आणि इतर अतिक्रमणे दिसून आल्याने ’येरे माझ्या मागल्या’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.
तात्पुरता दिलासा मात्र अतिक्रमण ‘जैसे थे’
सोमवारी अतिक्रमणावर हातोडा चालवल्यानंतर शहरातील रस्ते मोकळे झाले ज्यामुळे वाहतुकीला मोठा दिलासा मिळाला. पालिकेने काहीतरी कारवाई केली आहे हे दाखवण्याचा हा प्रयत्न स्तुत्य होता परंतु मंगळवारी सकाळी पुन्हा त्याच ठिकाणी जुन्या अतिक्रमण धारकांनी आपल्या हातगाड्या लावल्याचे चित्र यावल रोडवर दिसून आले. या प्रकारामुळे पालिकेच्या कारवाईची ’पॉवर’ केवळ 24 तासांपुरतीच मर्यादित असल्याचे सिद्ध झाले आहे.


शहरातील अनेक प्रमुख रस्ते अतिक्रमणांमुळे आधीच अरुंद झाले आहेत, ज्यामुळे वाहतूक कोंडी आणि पादचार्यांसाठी समस्या निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत पालिकेने केवळ ’कारवाई’ म्हणून कारवाई करण्याऐवजी, अतिक्रमण कायमस्वरूपी हटवण्यासाठी ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा, अशा तात्पुरत्या कारवाईचा नागरिकांना काहीही उपयोग होणार नाही.
यावर पालिकेने अधिक कठोर भूमिका घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे, असे मत शहरातील नागरिक व्यक्त करत आहेत.
वेळ, पैसा वाया
पालिकेकडून शहरातील अतिक्रमण काढण्याचे नियोजन करून दोन, तीन दिवस अतिक्रमण काढण्याची प्रक्रीया राबविली जाते, मात्र, पुन्हा अतिक्रमणधारक हे त्याच्या त्याच जागेवर पुन्हा व्यावसाय सुरू करतात, यामुळे कायमस्वरूपी यावर तोडगा काढण्याची गरज आहे. पालिकेचा वेळ, पैसाही या प्रकारातून वाया गेला आहे.






