चुंचाळेतील श्री वासुदेवबाबा दरबारात गुरुपौर्णिमा सोहळा उत्साहात
यावल (11 जुलै 2025) : यावल तालुक्यातील श्री सुकनाथबाबा तपोभूमी, श्री रघुनाथबाबा जन्मभूमी आणि श्री वासुदेवबाबा कर्मभूमी असलेल्या चुंचाळे येथे गुरुवार, 10 जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
दिवसभराच्या कार्यक्रमाचे स्वरूप
सकाळपासूनच चुंचाळे येथील श्री वासुदेवबाबांच्या दरबारात भाविकांची गर्दी दिसून आली. सकाळी 6 वाजता श्री सुकनाथबाबा, श्री रघुनाथबाबा, आणि श्री वासुदेवबाबांच्या मूर्तींना अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर सकाळी 8 वाजल्यापासून भजनी कार्यक्रम आणि भारुडे सादर करण्यात आली, ज्यामुळे वातावरण भक्तीमय झाले होते. दुपारी 12 वाजता विधिवत महाआरती करण्यात आली. महाआरतीनंतर दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले, ज्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.



पालखी मिरवणूक आणि दहीहंडीचा उत्साह
सायंकाळी पाच वाजेनंतर गावामध्ये भव्य पालखी मिरवणुकीत चुंचाळे, बोराळे आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गावामध्ये पालखीचे ऑप्शन काढलेला आहे. पालखी मिरवणूक आटोपल्यानंतर रात्री मंदिराच्या वतीने दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
दहीहंडी फोडण्याचा मान चुंचाळे येथील या दहीहंडीचा आनंद केवळ मंदिराचे भक्तच नव्हे, तर संपूर्ण गावातील तडवी समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात घेतला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून चुंचाळे गावातून एकतेचा आणि सलोख्याचा संदेश केवळ परिसरालाच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याला देण्यात आला, हे या सोहळ्याचे एक विशेष वैशिष्ट्य ठरले.
या पवित्र गुरुपौर्णिमा सोहळ्यात सहभागी होऊन दर्शन, महाप्रसाद आणि दहीहंडीच्या कार्यक्रमाचा भाविकांनी मनसोक्त आनंद घेतला, असे आवाहन चुंचाळे, बोराळे तसेच परिसरातील नागरिक व भाविकांना करण्यात आले होते. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडला. यावल पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वसंत बेलदार, पोलिस पाटील गणेश पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला.





