भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात शिक्षक-पालक सभा उत्साहात
Teacher-parent meeting in high spirits at K. Narkhede School in Bhusawal भुसावळ (23 जुलै 2025) : शहरातील के.नारखेडे विद्यालयात शिक्षक-पालक सभा अत्यंत उत्साहाच्या आणि खेळीमेळीच्या वातावरणात विद्यालयाचे मुख्याध्यापक-शिक्षक-पालक संघाचे अध्यक्ष वाय.एन.झोपे, शिक्षक पालक संघाच्या माजी उपाध्यक्षा अर्चना चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
याप्रसंगी सुरुवातीस विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असे विद्यालयाचे ध्येयगीत, प्रेरणा गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. पालक-शिक्षक संघाच्या सचिव नेहा पाटील यांनी शैक्षणिक 2024-25 या वर्षाचा कार्यकारिणीच्या कार्याचा अहवाल सादर केला. आजच्या आधुनिक युगात करिअरचे किती महत्त्व आहे. त्या दृष्टिकोनातून संगणक शिक्षण व विविध कोर्सेस या संदर्भातील तपशीलवार माहिती संगणक शिक्षिका वंदना वारके यांनी दिली.



बहुसंख्य विद्यार्थ्यांनी संगणकास प्रवेश घ्यावा, असे आवाहन सुद्धा केले. के.एन.सी.टी.आय. या संस्थेमार्फत अनेक वर्षांपासून सुरू असलेली एम. टी. एस. परीक्षेसंदर्भात माहिती विषद केली.विद्यालयातील शिक्षक सुरेश कापसे यांनी शिष्यवृत्ती परीक्षा, एम. टी.एस.परीक्षा, एन.एम.एम.एस.परीक्षा, ऑलिपियाड परीक्षा या विविध स्पर्धा परीक्षेसंदर्भात विस्तृत विवेचन केले.
याप्रसंगी शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्ष पदासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक वाय.एन.झोपे, उपाध्यक्ष म्हणून भागवत रामचंद्र पाटील यांची तसेच कार्यकारीणीतील इतर सदस्यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी काही पालकांनी विद्यार्थ्यांच्या संदर्भात समस्या मांडल्या. त्यांच्या सर्व समस्यांचे व शंकांचे समाधानकारक निरसन कार्यक्रमाचे अध्यक्ष वाय.एन.झोपे यांच्याकडून करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष मकरंद नारखेडे यांनी या शिक्षक-पालक संघाच्या सभेसाठी शुभेच्छा दिल्या. यशस्वीतेसाठी उपमुख्याध्यापिका संगीता अडकमोल, संगणक विभागप्रमुख बी.ए.पाटील, पर्यवेक्षक सुनील राणे आदींनी मार्गदर्शन केले. मनोज कुलकर्णी, दिनकर हेलोडे, नितीन पाटील, एस.पी.पाठक, मनोज तडवी, सुहास चौधरी, शैलेंद्र वासकर, शैलेंद्र महाजन, प्रदीप सपकाळे आदींचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमास विद्यालयातील तसेच संगणक विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन कांचन राणे यांनी तर आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापिका संगीता अडकमोल यांनी मानले.