भुसावळ जंक्शनवर 15 अवैध विक्रेत्यांवर कारवाई
दिव्यांग, महिलांच्या डब्यातील प्रवास भोवला 105 प्रवाशांना
भुसावळ (26 जुलै 2025) : भुसावळ जंक्शनवर रेल्वे गाडी आल्यावर दरवाजाच्या समोर उभे राहणार्या 15 विक्रेत्यांवर रेल्वे अॅक्टनुसार कारवाई करण्यात आली. यामुळे विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. भुसावळ रेल्वे स्थानकावर महिला आणि दिव्यांग डब्यांच्या सुरक्षेसाठी विशेष मोहिम राबविण्यात आली. यात दिव्यांगांच्या डब्यात प्रवास करणार्या 50 तर महिलांच्या डब्यात बसून प्रवास करणार्या 55 प्रवाशांवर रेल्वे अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर करण्यात आले. यामुळे दिव्यांग, महिलांच्या डब्यात प्रवास करणे प्रवाशांना भोवले आहे. ही मोहित नियमीत चालविली जाणार आहे.
कारवाईने उडाली खळबळ
भुसावळ रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) महिला आणि दिव्यांग प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत एक विशेष आणि व्यापक तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेचा मुख्य उद्देश महिला आणि दिव्यांग डब्यांमध्ये अनाधिकृत व्यक्तींचा प्रवेश रोखणे आणि रेल्वे परिसरातून अवैध विक्रेत्यांवर कारवाई करणे हा होता. सकाळपासूनच ही मोहिम राबविण्यात आली. यात महिला आरपीएफसह आरपीएफ जवानांचा सहभाग होता, रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ आयुक्त चित्रेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पी.आर. मीणा यांच्या नेतृत्वाखाली ही मोहिम राबविण्यात आली.



रेल्वे अधिनियम अंतर्गत,अनाधिकृत प्रवासासाठी कलम 155 आणि 162, तसेच रेल्वे हद्दीत अतिक्रमण आणि अवैध विक्री करणार्यांविरुद्ध कलम 144 / 147 नुसार एकूण 120 व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करून दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे अनधिकृत विक्रेते, फुकटे प्रवासी यांना आळा घालण्यास मदत झाली. या तपासणी अभियानासोबतच, प्रवाशांमध्ये सुरक्षिततेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी एक विशेष मोहीमही राबवण्यात आली. प्रवाशांना रेल्वे हेल्पलाइन 139 बद्दल माहिती देण्यात आली आणि आपत्कालीन परिस्थितीत या हेल्पलाइनचा वापर कसा करावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या यशस्वी मोहिमेमध्ये आरपीएफ निरीक्षक पी.आर. मीणा, आरपीएफ कर्मचारी आणि वाणिज्य विभागातील कर्मचार्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ही मोहीम प्रभावीपणे राबवता आली आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी मिळाली.आरपीएफच्या या कारवाईमुळे भुसावळ रेल्वे स्थानकावर प्रवाशांची सुरक्षितता अधिक बळकट झाली आहे.
या गाड्यामध्ये केली तपासणी
या मोहिमेदरम्यान आरपीएफने भुसावळ जंक्शनवर आलेल्या पाटलीपुत्र एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस, गोवा एक्स्प्रेस, ताप्ती गंगा एक्सप्रेस यासारख्या प्रमुख गाड्यांमधील महिला आणि दिव्यांग डब्यांची कसून तपासणी करण्यात आली. या तपासणीत, महिला आणि दिव्यांग डब्यांमध्ये विनाकारण घुसलेल्या आणि प्रवाशांना त्रास देणार्या अनाधिकृत व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली. दिव्यांग डब्यातून 50 तर महिलांच्या डब्यातून 55 असे 105 प्रवाशांना खाली उतरवित रेल्वे अॅक्टनुसार कारवाई केली. न्यायालयात हजर केले असता, त्यांना दंड झाला.
धडक मोहिम राबविणार
भुसावळसह विभागात अवैध विक्रेते, दिव्यांग, महिलांच्या डब्यातबसून प्रवास करणार्या प्रवाशांविरूध्द कारवाई केली जात आहे, अवैध विक्रेते आरपीएफच्या रडारवर आहे, यासाठी आरपीएफ अधिकार व कर्मचारी यांचे पथक नियुक्त केले आहे. त्यानुसार नियमीत कारवाई केली जाणार असल्याचे रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ आयुक्त चित्रेश जोशी म्हणाले.